मुंबई |Mumbai –
नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाचा 377 कोटी रूपयांचा निधी सध्या राज्य सरकारकडे थकीत आहे,
बीड जिल्हयाच्या सुपरफास्ट विकासात मानाचा तुरा असणार्या या रेल्वेच्या कामाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष ही बीडच्या विकासाला खीळ आहे, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. Nagar-Beed-Parli railway route
त्या म्हणाल्या, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जिल्हयातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्वप्न होते. या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्याने अर्धा अर्धा वाटा देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी प्रकल्पाला दिला आहे, त्या निधीतून सध्या काम सुरू आहे, परंतु राज्य सरकारकडे या प्रकल्पाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा 228 कोटी आणि सन 2020-21 मधील 149 कोटी असा एकूण 377 कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी मंगळवारी रेल्वे अधिकार्यांच्या घेतलेल्या व्हर्चुअल आढावा बैठकीतून उघड झाले आहे.
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून हा निधी रेल्वे प्रकल्पाला मिळाला नाही, त्यामुळे प्रकल्प रखडण्याची भिती आहे, असे होणे जिल्हयाच्या प्रगतीला फार मोठा अडथळा असून, विकासाला खीळ बसणार आहे. सरकारने त्यांच्या वाट्याचा थकीत 377 कोटीचा निधी तातडीने द्यावा तसेच या विषयावर संबंधित जिल्हयाचे खासदार व पालकमंत्र्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना यासंदर्भात आपण एक निवेदन पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.