अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना हळूहळू नगर शहराला विळखा घालू लागला आहे. केडगाव, सारसनगर, भिंगार, सावेडी, नागापूर-बोल्हेगाव या सभोवतालच्या उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातही करोनाने चांगलेच पाय पसरले आहेत. सावेडीतील पद्मानगर व भिंगार भागात बुधवारी पुन्हा रुग्ण आढळल्याने हा परिसर प्रशासनाने सील केला आहे.
नगर शहरात करोना बाधितांची संख्या चांगलीच वाढू लागली आहे. रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. बुधवारी यामध्ये शहरातील 21 रुग्णांची वाढ झाली. बुधवारी सकाळी पहिल्या अहवालात पद्मानगर भागात पाच रुग्णांची भर पडली. तसेच सुडकेमळा आणि सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण करोना बाधित असल्याचे समोर आले. दुपारी आलेल्या अहवालात अगोदरच करोनाने कहर माजवलेल्या तोफखाना भागात आणि नवीन 10 रुग्णांची भर पडली. त्या पाठोपाठ ढवणवस्ती येथे दोन, केडगाव भूषणनगर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
पद्मानगर भागातील रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासकीय अधिकार्यांनी दुपारी या भागाची पाहणी करून तो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. त्यामुळे पाइपलाईन रस्त्याच्या उत्तरेकडील बराचसा भाग आता सील झाला आहे. यामध्ये जुना पिंपळगाव रस्ता, साई एन्क्लेव्ह अपार्टमेंटमधील दुकाने, पाइपलाईन हडकोमधील अंतर्गत रस्ते, जय सीतारामा सुपर मार्केट, नूतन मराठी शाळा, गिरिधन अपार्टमेंट शेजारचा भाग आदी परिसराचा समावेश आहे.
तसेच जुन्या पिंपळगाव रस्त्याच्या पूर्व बाजूकडील वसाहती, जय तुळजाभवानी नगर, ज्ञानेश्वर नगर, दत्तनगर, एकविरा चौक, पाइपलाईन हडको वसाहतीचा दक्षिण भाग, पाइपलाईन रस्ता, यशोदानगर वसाहत, यशोदानगरच्या उत्तरेकडील खुली जागा, गावडेमळा, शिवचिदंबर मंदिर, साई इंग्लिश मीडियम स्कूल ते तुळजाभवानी मंदिर हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
भिंगार परिसरातही रुग्ण आढळल्याने अहमदनगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी एक आदेश काढून तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. भिंगारमध्ये लोहार गल्ली, मुळे गल्ली, गवळी वाडा हा भाग कंटेन्मेंट झोनमध्ये तर सदर बाजार आणि उर्वरित भिंगार शहर बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
पद्मानगर आणि भिंगारमध्ये हा भाग 14 दिवस बंद राहणार आहे. त्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वच व्यवहार बंद राहणार असून, बफर झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. भिंगारमध्ये नागरिकांना याचा अधिक ताप होणार आहे. जवळपास पूर्ण शहरच बंद राहणार असल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. भिंगारपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मात्र ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या आलमगीर परिसरातही रुग्ण आढळलेला असल्याने तेथे अधिक खबरदारी घेतली जात आहे.
बालिकाश्रम रस्त्यावरील सुडकेमळा, लेंडकर मळा, भगवान मळा आदी भागात करोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत. सुडकेमळ्यात बुधवारी पुन्हा एक रुग्ण आढळल्याने आता या भागावर प्रशासनाने बारकाईने नजर ठेवली आहे.