अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
नगर महापालिकेतील एका अधिकार्याला आणि दोन कर्मचार्यांना करोना झाल्यामुळे कर्मचारी घाबरले आहेत. यामुळे महापालिकेचे कामकाज बंद करण्याचे वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या 16 तारखेपासून नगर शहरात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावर आयुक्तांनी हा चेंडू जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
नगर शहरातील करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. शहरात करोना उद्रेक झालेल्या नऊ ठिकाणी आधी कंटेन्मेंट आणि बफर झोन लावण्यात आलेले आहे. मात्र, त्यानंतर देखील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. गेल्या काही दिवसांत शहरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
शहरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या 16 तारखेपासून जनता कर्फ्यू (संपूर्ण लॉकडाऊन) लागू करण्यासंबंधी सोमवारी दुपारी 12 वाजता नगरच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा गटनेता, विरोधी पक्षनेता, आयुक्त, पोलीस प्रमुख, अभियंते उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत 16 तारखेपासून शहरात कडकडीत बंद ठेवण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकार आणि जिल्हाधिकार्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात 16 तारखेपासून पुढील सात दिवस व त्या परीस्थितीमध्ये फरक न झाल्यास आणखी पुढील सात दिवस शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मनपा आयुक्तांनी हा विषय जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीतील असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेच या विषयावर निर्णय घेतील, असे स्पष्ट केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मनपाच्या एका अधिकार्यासोबत दोन कर्मचार्यांना करोनाची बाधा झाल्याने कार्यालयात कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे लवकरच महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
नगर शहरातील संभाव्य लॉकडाऊनला शिवसेनेचा विरोध नाही. मात्र, करोना रोखण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले. आधीच शहरात प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता. विशेष म्हणजे मनपाकडे करोना रोखण्यासाठी प्रभावी साधने आणि यंत्रणा नाही. मनपा आयुक्त करोना रोखण्यात अपशयी ठरले असून या ठिकाणी सक्षम अधिकारी असणे गरजेचे होते, अशी टीका शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केली.