Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर शहराची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने ?

नगर शहराची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने ?

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिकेच्या हद्दीत करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आधीच अर्धे शहर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. मात्र, तरी करोना फैलाव थांबण्याचे नाव घेत नसल्याने संपूर्ण नगर शहरात कंटेंन्मेंट करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन आहे. यासाठी महापालिकेच्या पथकाने रविवारी शहरातील लक्ष्मीकारंजा परिसर व सावेडी उपनगरात पाहणी केली आहे.

- Advertisement -

त्यानंतर सायंकाळी चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, जिल्हा वाचनालय, चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक हा परिसर कंटेन्मेंट झोन आजपासून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान संसर्ग असाच वाढत राहिल्यास संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा असल्याचे सुत्रांनी सांगितले.

नगर शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असून शनिवारी शहरात 62 बाधित समोर आले आहेत. तर जिल्ह्याची आकडेवारी 950 च्या पुढे गेली आहे. शहराच्या चारही बाजूने नव्याने करोना रुग्ण समोर येत आहेत. विशेष करून सावेडी उपनगर ही करोनाने व्यापण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे आता सावेडी उपनगरातही ज्या भागात रुग्ण जास्त आहेत, अशा भागात कंटेन्मेंट झोन करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. रविवारी सायंकाळपर्यत शहरातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 393 च्या झाली होती.

नगरमध्ये सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, आडतेबाजार, पद्मानगर, बागरोजा हडको व नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) आणि अन्य असे आठ कंटेन्मेंट झोन आहेत. याशिवाय शनिवारी सावेडीतील भिस्तबाग नाका येथे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे या भागात व शहरातील लक्ष्मीकारंजा परिसरात महापालिकेच्या पथकाने पाहणी केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन झाले आहे. त्यातच आता रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगरगल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासुभाष चौक, जगदीश भुवन मिठाईवाले हॉटेल पाठीमागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्के2 ते पटवर्धन चौक हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

या बफर झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद राहणार आहे. शहरात करोनाचा संसर्ग न थांबल्यास कंटेन्मेंट झोन करण्यापेक्षा काही काळासाठी शहरच लॉकडाऊन करण्याच्या विचारात मनपा प्रशासन आहे.

शहराच्या सर्वच भागात सध्या पेशंट वाढू लागले आहेत. पेशंट वाढीचा हा दर असाच कायम राहिल्यास, येत्या दोन दिवसांत संपूर्ण नगरच लॉकडाऊन करण्याबाबत विचार होऊ शकतो असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर शहर पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीमुळे नगरकर पुन्हा खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी करतांना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या