Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर शहरात दोन गटात राडा; माजी नगरसेवक जाधव यांना मारहाण

नगर शहरात दोन गटात राडा; माजी नगरसेवक जाधव यांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभेच्या मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांच्यासह कार्यकर्ते एकमेकांविरूध्द भिडल्याचे पाहायला मिळाले. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान मारहाणीत जखमी झालेले नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र उपाध्ये, मजहर तांबटकर, मयुर राऊत, सागर मुर्तडकर, चेतन आग्रवाल, सनी मुर्तडकर व गणेश भिंगारदिवे (सर्व रा. नगर शहर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी (दि. 12) दुपारी तीनच्या सुमारास जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंगलगेट येथील कार्यालयात बसलेले असताना तेथे सागर मुर्तडकरसह सात जण आले. त्यांनी कार्यालयाच्या दरवाजाला लाथा मारून आत प्रवेश केला. मारून टाकण्याची धमकी देत जाधव यांना मारहाण केली. जाधव यांनी कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता सागर मुर्तडकर याने खालीपाडून मारहाण केली. महेंद्र उपाध्ये याने गळा दाबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जाधव यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत कार्यालयाबाहेर धाव घेतली. तेथे नागरिक जमा झाल्याने मारहाण करणारे घटनास्थळावरून पळून गेले. त्यांनी पुढे राजेंद्र हॉटेलसमोरून दगडफेक केली. त्यातील एक दगड नंदु बेद्रे यांना लागून ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती निवळण्याचे काम केले. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, मंगलगेट परिसरातील राड्याची माहिती मिळताच, याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या