कोल्हार |वार्ताहर| Kolhar
नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज तासनतास खोळंबणार्या वाहतूक समस्येला कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर आणि कोल्हार खुर्द येथील ग्रामस्थ वैतागले आहेत. वर्षानुवर्षांपासून येथे कायम ठप्प होणारी वाहतूक डोकेदुखी बनली आहे. या समस्येमुळे येथील बाजारपेठ उध्वस्त होत आहे. मात्र ही समस्या सोडविण्यासाठी कुणालाही फुरसत नाही. या समस्येसंबंधी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील व्यापारी संघटनेने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मंडळास निवेदन दिले. 15 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन तसेच नंतर शनिवार आणि रविवार अशा जोडून तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूरला येणार्या भाविकांची संख्या कमालीची वाढली. पर्यायाने नगर-मनमाड महामार्गावर वर्दळही वाढली. त्यात कोल्हारच्या पुलावर मोठमोठ्या आकाराचे खड्डे असल्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या बळावली. तीन दिवस 24 तास पुलावर वाहतूक ठप्प होत होती. अनेक अपघातांच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक तर वैतागलेच, परंतु स्थानिक रहिवाशांमध्ये देखील प्रचंड संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावर यासंदर्भात टीकेची झोड उठली. जनभावना लक्षात घेत कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत तसेच कोल्हार भगवतीपूर व्यापारी असोसिएशनने राष्ट्रीय राजमार्ग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी थेट अहिल्यानगर येथे जाऊन संपर्क साधला. त्यांना रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-भगवतीपूर ही राहाता तालुक्यातील अग्रगण्य बाजारपेठ आहे. शिर्डी व शनी शिंगणापूर हे जागतिक दर्जाचे देवस्थान याच महामार्गावर आहे. गेल्या 30 वर्षांपासून नगर – मनमाड महामार्गाचे काम सुरू असून अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. या कालावधीमध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रवरा नदीवरील पुलाची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात तसेच वाहनांच्या नादुरुस्तीमुळे पुलावर व नगर-मनमाड रोडवर 8 ते 10 तास वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे कोल्हारमध्ये येणार्या भाविकांचे तसेच दवाखान्यात येणार्या रुग्णांचे, शाळा कॉलेजमध्ये येणार्या विद्यार्थ्यांचे व खरेदीसाठी येणार्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. अद्याप ते काम सुरू झाले नाही. यासंदर्भात अनेक वेळा शासकीय पातळीवर निवेदन देऊनदेखील कुठलीही सुधारणा झाली नाही. प्रवरा नदीवरील जुन्या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती व नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा कोल्हार-भगवतीपूर व परिसरातील ग्रामस्थांना मोठे आंदोलन करावे लागेल, याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची राहील. सदर रस्त्याच्या कामाबाबत साईड गटार, सिडी वर्क या संदर्भात नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी आपल्या कार्यालयाचे अधिकार्यांनी ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक येथे येऊन शंकांचे निरसन करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे आणि ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
कोल्हार-भगवतीपूर व्यापारी असोसिएशनने दिलेल्या निवेदनात वरीलप्रमाणे नगर-मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था दर्शविण्यात आलेली आहे. कोल्हार येथील पुलावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होऊन लांबच्या लांब रांगा लागत आहेत. व्यापारी पेठेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. काही व्यापार्यांवर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे. संबंधित अधिकार्यांनी तातडीने याची दखल घेऊन काम सुरू न केल्यास येथील व्यापार्यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खर्डे यांची स्वाक्षरी आहे.
…अन्यथा जनहित याचिका दाखल करू
गेल्या 30 वर्षांपासून नगर-मनमाड महामार्गाचे काम व्हावे यासाठी असंख्य वेळा आंदोलने झाली. वारंवार मागण्या करण्यात आल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रस्त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करूनच या प्रश्नासंबंधी दाद मागितली जाईल. तसेच खड्ड्यांमुळे होणार्या अपघातात या महामार्गावर हजारो लोकांचे बळी गेले. याबद्दल संबंधित अधिकार्यांसोबतच ठेकेदार, राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असे कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी सांगितले.




