Friday, November 22, 2024
Homeनगरनगर-मनमाड महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा!

नगर-मनमाड महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा!

मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ || वाहन चालकांची होतेय कसरत

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. एकाच पावसात महामार्गाची दाणादाण उडाली आहे. त्याबरोबर खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे. रात्रीच्यावेळी हे खड्डे दिसत नसल्याने दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे अनेकांचे मणक्याचे आजार देखील वाढले आहेत. बांधकाम विभागाचे रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

- Advertisement -

सध्या नगर-मनमाड महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतमध्ये काम करणारे कामगार रात्री उशीरा काम संपून जात असताना त्यांना या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढणे अवघड होत आहे. रात्रीची वेळ असल्याने तसेच या दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदतीला देखील कोणी नसते. खड्डे एवढे मोठे आहे की, त्यांनी रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. त्यामुळे हे खड्डे चुकविणे देखील जिकिरीचे झाले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच शनिवार, रविवारसह सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे सरकारी बाबूंची शिर्डी, शिंगणापूर येथील देवदर्शनासाठी प्रचंड गर्दी या रस्त्यावर होत असते. रस्ता खराब असल्याने यावेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार म्हणावा लागेल. रस्ता दुरुस्त करण्याऐवजी लोकांचा जीव जाण्याची वाट बांधकाम विभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे.

राहुरी फॅक्टरी येथील मनमाड कडे जाणार्‍या या रस्त्यावरील बसस्थानकाजवळ मोठा खड्डा सध्या जिवघेणा ठरतोय. या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने राज्य परिवहनच्या बसेस राहुरी फॅक्टरी येथे थांबा घेत नाहीत. हा जीवघेणा खड्डा संबंधित प्रशासनाने त्वरीत बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील प्रवासी वर्गाकडून होत आहे. दरवर्षी हीच समस्या याच ठिकाणी का होते? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या