अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या 15 दिवसात नगर-मनमाड महामार्गाची दुरूस्ती करण्यात येईल. याची जबाबदारी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे दुरूस्तीचे काम 15 सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी दिले. नगर- मनमाड महामार्गाची दयनीय स्थिती झाल्याच्या निषेधार्थ कृती समितीने येत्या 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्याच्या विषयावर बैठक घेतली.
जिल्हाधिकारी सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे म्हणाले, नगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दोन वेळा निविदा काढल्या होत्या. बीओटी तत्वावर हे काम होणार होते. मात्र, त्या कमी दराने भरल्या गेल्या. त्यानंतर ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले. त्यामुळे अनेक अपघात होऊन निष्पापांचे बळी गेले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही ठेकेदारांवर कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या 15 दिवसांत या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या रस्त्याची वाहतूक वळवली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांवर ही जबाबदारी दिली गेली आहे. 15 सप्टेंबरला या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याने कृती समितीने 1 सप्टेंबरपासूनचे आंदोलन स्थगित केले आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
हायब्रीड व बीओटी अशा दोन्ही मिळून हॅम्प पध्दतीने रस्त्यांची 25 ते 30 हजार कोटींची कामे देशभरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुमारे हजार कोटींचे असले तरी ते हॅम्प पध्दतीने व्हावे, यासाठी कृती समितीसमवेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले, बीपीसीएल व रिलायन्स कंपन्यांनी गॅस पाईपलाइनसाठी या रस्त्याचा खोदलेला भाग पुन्हा दुरूस्त करून देण्याबाबत दोन्ही कंपन्यांना सांगितले जाणार आहे. पावसाळा जरी सुरू असला तरी पावसाळ्यात काम करण्याच्या नवीन पध्दतीने रस्त्याची दुरूस्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
दरम्यान, मालवणला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेत राजकारण आणणे दुर्दैवी आहे. नौसेनेने तो उभारला होता व त्यांनी त्याच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. पण कोणत्या प्रश्नावर राजकारण करावे, याचे भान विरोधकांना राहिलेले नाही, असा दावाही विखे यांनी केला. जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस आहे, जायकवाडी 65 टक्के भरल्याने यंदा त्यांच्यासाठी पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. लाभक्षेत्रात कमी पाऊस आहे. मात्र, कोठे अवकाळीने नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याचे कायमस्वरूपी आदेश दिलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दस्त नोंदणी कार्यालयांतून दलालांचा सुळसुळाट झाल्याची कबुली देऊन मंत्री विखे पाटील म्हणाले, नियमबाह्य कामांचे ऑडीट सुरू केल्याने दलालांना चाप बसणार आहे तसेच तुकडे बंदीसंदर्भात पुढील महिन्यात नवे धोरण मंत्रिमंडळासमोर आणले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुरूस्तीसाठी नऊ कोटींचा निधी मंजुर : खा. लंके
नगर-मनमाड रस्त्याची रखडलेली दुरूस्ती अखेर मार्गी लागली असून या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आठ कोटी 85 लाख रूपयांचा निधी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केला असल्याची माहिती खा. नीलेश लंके यांनी दिली. दरम्यान, या रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही खा. लंके यांनी सांगितले. मंत्री गडकरी यांच्या आदेशानुसार जुन्या ठेकेदारास निलंबित करण्यात येऊन नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने काम सुरू होईपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.