Saturday, May 4, 2024
Homeनगर‘ते’ येणार म्हणून नगर-मनमाड महामार्गावर दुरूस्तीची नौटंकी

‘ते’ येणार म्हणून नगर-मनमाड महामार्गावर दुरूस्तीची नौटंकी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

‘ते’ येणार याच महामार्गावरून जाणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित झालेल्या नगर-मनमाड महामार्गावर चक्क डांबर टाकून व खड्डे बुजवून डागडुजीचा फार्स करण्यात आला. संबंधित अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधींच्या या नौटंकीमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिकांनी अक्षरशः तोंडात बोटे घालून आश्चर्य व्यक्त केले आहे. एरव्ही अनेक अपघात आणि प्रवाशांचे बळी जाऊनही निर्ढावलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांनी तक्रारीचा पाऊस पडूनही दुर्लक्ष केले होते. मात्र, आता आपले ‘त्यांच्या’समोेर पितळ उघडे पडू नये, यासाठी त्यांनी जिवाचा चालविलेला आटापिटा नागरिकांच्या टिकेचा विषय झाला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून नगर-मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था झालेली आहे. महामार्गावर मोठे खड्डे पडले असून अपघाताबरोबरच बळींचीही संख्या वाढू लागली आहे. वाहनचालकांनाही मोठ्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. तर प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या दुरूस्तीबाबत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला. मात्र, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदाराने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवाशी संतप्त झाले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून राहुरी फॅक्टरी येथील बसस्थानकासमोर चक्क डांबरीकरण करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

दरम्यान, आज गुरूवारी राहुरी विद्यापीठात राज्यपाल, केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे कार्यक्रमानिमित्ताने येणार आहेत. तर राज्यपाल प्रवरानगरकडे याच महामार्गावरून वाहनाने जाणार असल्याचे समजताच ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेतून जागे झाले. त्यांनी तातडीने या महामार्गाची तात्पुरती डागडूजी करण्याची नौटंकी सुरू केली आहे. मात्र, या महामार्गावरील अनेक मोठे खड्डे अद्यापही तसेच ठेवण्यात आले असून वरवर पोचारा फिरविण्यात आला असल्याची टीका प्रवाशांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या