उंबरे |वार्ताहर| Umbare
नगर-मनमाड महामार्गावरील रखडलेल्या रस्ते कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत असून, दैनंदिन प्रवासी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. सकाळ व सायंकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत चालले आहेत. या गंभीर स्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट महामार्गावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. अपूर्ण रस्ते काम, अव्यवस्थित वळणमार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिकच गंभीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी वाहनचालक, नागरिक व स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. पाहणीदरम्यान पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी उपस्थित होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांनीही संयम बाळगण्याचे आवाहन केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. काम वेळेत पूर्ण झाल्यास कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्याचे संकेतही डॉ. विखे पाटील यांनी दिले.




