उंबरे |वार्ताहर| Umbare
आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो, काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत राहुरी शहरातील व्यापारी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, राहुरी शहरातून जाणार्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापार्यांकडून मांडण्यात आल्या.
बैठकीदरम्यान नागरिक व व्यापार्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, शिवाजीराव सोनवणे, जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, चिटणीस रविंद्र म्हसे, भाजपा गटनेते राजेंद्र उंडे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, प्रकाश पारख, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, सुरेश भुजाडी, नयन शिंगी, सुनील पवार, अजित डावखर, अमोल काशीद, सचिन भोंगळ, राजेंद्र वराळे, संतोष बर्डे, वृषभ लोढा यांच्यासह, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच राहुरी शहरातील व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या, असा स्पष्ट संदेशही यावेळी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.





