देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
लोकसभेची निवडणूक संपताच नगर-मनमाड राज्यमहामार्गाचे काम बंद पडले. संबंधित ठेकेदार व रस्त्यावरील सर्व मशिनरी अचानक गायब झाली आहे. ही नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणावी लागेल. लोकसभा निवडणुकीत कोण हरलं? कोण जिकंल? या पेक्षा या निवडणुकीत जनताच हरली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गेल्या अनेक वर्षापासून काम रखडलेला नगर-मनमाड हा एकमेव राज्यमहामार्ग. या रस्त्याच्या कामाचे टेंडर पास होऊन कामाला सुरुवात झाल्यापासून टक्केवारीवरून या महामार्गाची चर्चा झाली. रस्त्याचे काम नगरकडून सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवला. त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक वळविण्यात आली होती.
या महामार्गावर शिर्डी – शिंगणापूर सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान आहेत. त्यामुळे भाविकांची वाहनाची मोठी वर्दळ असते. तसेच आंध्र व तामिळनाडूसाठी हा मधला मार्ग असल्याने मोठ्याप्रमाणात जड व अवजड वाहनाची देखील मोठी वर्दळ नेहमी असते. याच महामार्गावरून जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांच्या उसाची गळीत हंगामात वाहतूक केली जाते. या रस्त्याच्या क्षमते पेक्षा वाहतूक जास्त असल्याने कायमच या रस्त्यावरील वाहतूक जाम असते. अनेकदा या रस्त्याचे डांबरीकरण होऊन देखील पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडण्याची परंपरा कायम जपण्यात संबंधित ठेकेदारांनी धन्यता मानली आहे. मात्र याच रस्त्याच्या कामाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो निरपराध नागरिकांंचे गंभीर अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडोंना कायमचे अपंगत्व आले आहे.
या महामार्गाचे लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यापासून जोरात काम सुरू झाले होते. असे वाटत होते आता हा रस्ता एकदाचा पूर्ण होणार. कारण अनेकदा रस्त्याचे बंद पडलेले काम सुरू होईपर्यंत अगोदर तयार केलेला रस्ता मागे पुन्हा जैसे थे होतांना नागरिकांनी पाहिला आहे. परंतु यावेळी मात्र काम जोरात चालू होते.पुन्हा एकदा या रस्त्याची साडेसाती उफाळून आली. लोकसभा निवडणूक संपली आणि रस्त्याचे काम बंद पडले.कदाचित पावसाळा सुरू झाल्याने डांबरीकरणाचे काम बंद झाले असेल. परंतु अनेक ठिकाणी भराव टाकण्याचे व खडी टाकण्यासह इतर काम सुरू ठेवणे गरजेचे होते.परंतु, दुर्दैवाने तसे काही दिसत नाही. रस्त्याच्या कामाची संपूर्ण मशिनरीच अचानक गायब असल्याचे दिसत आहे. नेहमीच राजकीय विळख्यात सापडलेला हा महामार्ग कायमच अपूर्ण राहणार का? या रस्त्याचे पूर्णकाम कधी होणार? या प्रश्नाची उत्तरे आता काळच देईल ?
सुरुवातीला दुपदरी असलेला हा रस्ता नंतर चार पदरी झाला.त्यावेळी सुमारे 300 कोटीचे टेंडर पास झाले होते. परंतु, टक्केवारीमुळे संबंधित ठेकेदाराने हे काम मध्येच सोडले. त्यानंतर जळगाव येथील ठेकेदाराला काम दिले. त्या ठेकेदाराने कामाचे टप्पे पाडून इतर ठेकेदाराला दिल्याने कामाचा दर्जा राहिला नाही. वर्षभरात ‘रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता’ हेच समजेना.आता सुमारे 900 कोटीचे टेंडर झाले. त्यालाही टक्केवारीचे ग्रहण लागल्याची चर्चा आहे.