Tuesday, September 17, 2024
Homeनगरनगर-मनमाड रस्ता कृती समितीचे रास्तारोको आंदोलन स्थगित

नगर-मनमाड रस्ता कृती समितीचे रास्तारोको आंदोलन स्थगित

पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची मध्यस्थी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने रविवार दि.1 सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळानदी पुलावर बेमुदत रास्तारोको अंदोलन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती रस्ता कृती समितीने दिली आहे. नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने रविवार दि.1 सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळानदी पुलावर बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. यावर तोडगा काढण्यासाठी काल बुधवार दि.28 रोजी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी तसेच सीएनजी पाईपलाईनचे अधिकारी उपस्थित होते. ना.विखे पाटील यांच्यासमोर रस्ता दुरुस्त कृती समितीच्या सदस्यांनी आतापर्यंत नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेले अपघात व अपघातात निधन झालेल्या कुटुंबांचे हाल याची व्यथा मांडली. राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी यांच्यावर अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. यावेळी बैठकीला संबोधित करताना ना.विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला व राष्ट्रीय राजमार्गचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवत 15 सप्टेंबरपर्यंत नगर-शिर्डी रस्त्यावर अवजड वाहतुकीला वळविण्यात आले आहे. तसेच तात्काळ ठेकेदारांची नियुक्ती करून नगर-शिर्डी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे ठरले आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम चालू असताना काम करणार्‍या ठेकेदाराने रस्त्यावर संपर्क क्रमांक टाकलेले बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर सीएनजी पाईपलाईनचे अधिकारी मनोज शिंगोटे यांना सीएनजी पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश देण्यात आले. रस्ता दुरुस्त कृती समितीने केलेली अवजड वाहतूक बंद करण्याची व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तात्काळ ठेकेदाराची नियुक्ती करण्याची मुख्य मागणी ना.विखे पाटील यांच्या मध्यस्थीने सुटल्यामुळे 1 सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे कृती समितीने कळविले आहे. या बैठकीस कृती समितीच्यावतीने देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, राजेंद्र शेटे, वसंत कदम, देवेंद्र लांबे, सतीश घुले, सुनील विश्वासराव, दीपक त्रिभुवन, प्रशांत काळे, नितीन कल्हापुरे, प्रशांत मुसमाडे, हसन सय्यद, साई त्रिभुवन आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या