Monday, November 25, 2024
Homeनगरजायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

जायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

राहाता । तालुका प्रतिनिधी

जून-जुलै महिना संपत आला तरी जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा ८ टक्केच्या आत म्हणजे ६ टिएमसीच होता. त्यादरम्यान नगर-नाशिक मधील धरणांतील पाणीसाठे समाधानकारक पातळीवर पोहचले होते. दारणा भंडारदरा मधील पाणीसाठे नव्वद टक्के झाले होते तर इतर धरणे ६० टक्क्यांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडावे लागेल किंवा कसे याची चिंता लाभधारकांना भेडसावत होती.

- Advertisement -

सुदैवाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सह्याद्री घाटमाथा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात एकदम वाढ झाली तसेच गोदावरी, प्रवरा या नद्या दुथडी भरून वाहण्यास सुरवात झाली. जायकवाडीचा पाणीसाठा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ६ टिएमसी वरून २० टिएमसी म्हणजे २६ टक्के झाला आहे. तर नगर नाशिकमधील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्क्यांकडे वाटचाल करीत आहेत आणि त्यामुळे साहजिकच टंचाईचे संकट दूर झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

हे ही वाचा : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण योजने’साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले पात्र? आकडेवारी समोर

अशी परिस्थिती असली तरी नगर-नाशिक मधील लाभधारकांना जायकवाडीतील अपुऱ्या जलसाठ्याची चिंता भेडसावत आहे. कारण पावसाळा संपेपर्यंत १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीमध्ये ६५ टक्के म्हणजे ५० टिएमसी उपयुक्त पाणीसाठा न झाल्यास समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार गतवर्षीप्रमाणे नगर-नाशिक मधील धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. यामुळे सध्या जिल्ह्यातील धरणे भरल्याच्या आनंदापेक्षा जायकवाडी कितपत भरणार, याचीच चिंतायुक्त चर्चा होत आहे.

नगर-नाशिक मधील धरणांची परिस्थिती समाधानकारक असली तरी लाभक्षेत्रातील परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. लाभक्षेत्रात पाऊस अत्यंत कमी असल्याने अद्याप ओढेनाले वाहीले नाहीत. त्यामुळे भूजल पातळी अद्यापही खालावलेली आहे. विहिरींनाही नव्याने पाणी आलेले नाही. थोड्याफार दिवसांच्या अंतराने पावसाच्या हलक्या सरी पडल्याने खरिपाची पिके चांगल्या स्थितीत आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

हे ही वाचा : श्रीगाेंंद्यातून राज्यभर जोरदार गुटखा विक्री, आशीर्वाद कुणाचा?

रब्बी किंवा उन्हाळी हंगामाचे भवितव्य अद्यापही जायकवाडीत ६५ टक्के म्हणजे ५० टिएमसी उपयुक्त पाणीसाठा होतो किंवा नाही यावर अवलंबून आहे. जायकवाडीला पहिल्यांदा २०१२ मध्ये पाणी सोडले होते. सन २०२३ पर्यंतच्या १२ वर्षांत एकूण ६ वर्षे पाणी सोडले गेले आहे. २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१८, २०२३ या वर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडले होते. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी धरणात असणारा जिवंत पाणीसाठा विचारात घेऊन समन्यायी कायद्यानुसार पाणी सोडायचे किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो.

निर्णय घेताना खरिपातील पाणी वापर हिशोबात घेतला जातो. ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत शासनास अवगत करून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु याबाबत उशिरा कार्यवाही केली जाते. त्यामुळे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून जाते तसेच नदीपात्र कोरडे पडल्याने वहनव्यय सुध्दा बाढतो. समन्यायीचे हे संकट दरवर्षीच नगर- नाशिकमधील लाभधारकांना अस्वस्थ करते.

हे ही वाचा : …अन् खा. लंकेंनी थांबविली बनपिंप्री येथील टोल वसुली

जायकवाडीतील सध्याच्या कमी पाणी साठ्यामुळे नगर-नाशिकमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी यावर्षी जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ येणार नाही अशी आशादायक स्थिती निर्माण होत आहे. एल- निनोचा प्रभाव संपुष्टात येत असून ऑगस्टच्या उत्तरार्धापासून ऑक्टोबर अखेरपर्यंत ला-निनोचा प्रभाव वाढणार असल्याने जोरकस मान्सुनसाठी पोषक वातावरण आहे. तसेच हिंदी महासागर द्विधृव स्थिती सध्या नकारात्मक नसल्याने मान्सुनचा जोर वाढण्यासाठी पूरक आहे. आतापर्यंतचा मान्सून नगर-नाशिक जिल्ह्यात सह्याद्री घाटमाथ्याच्या पुढे जोरकसपणे सरकलाच नाही. परंतु ऑगस्ट अखेरपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत परिस्थिती बदलून उशिरापर्यंत समाधानकारक पाऊस होईल आणि समन्यायीचे संकटही दूर होईल. लाभधारकांकडून खरिपात पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. खरिपातील आवर्तन देण्यासाठी जायकवाडीत ३७ टक्के म्हणजे २८ टिएमसी उपयुक्त पाणीसाठा पाहिजे. सध्या जायकवाडीत २६ टक्के म्हणजे २० टिएमसी पाणी असून दररोज अर्धा टिएमसी आवक होत आहे.

– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या