पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
गेल्या काही दिवसांपासून नगर-पुणे महामार्गावर सुरू असलेले अपघातांची मालिका सुरुच आहे. शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ दोन कारच्या धडक होऊन झालेल्या अपघातात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून, नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये ती मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादात पुण्याहून नगरकडे भरधाव वेगाने चाललेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने दुभाजकावरून पलीकडे जात नगरकडून पुण्याकडे जात असलेल्या पांढर्या रंगाच्या कारला जोराची धडक दिली.
पांढर्या कारमध्ये असलेली कु. अन्वी बाळासाहेब खडके गंभीर जखमी झाली. तिला स्थानिकांच्या मदतीने शिरूर येथे उपचारासाठी पाठवले. तेथून पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातास कारचालक पल्लवी प्रितेश खरात कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात पल्लवीचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समजते.




