Sunday, November 10, 2024
Homeक्राईमपुण्याकडे निघाले, लघुशंकेसाठी थांबताच कुटुंबाला लुटले

पुण्याकडे निघाले, लघुशंकेसाठी थांबताच कुटुंबाला लुटले

केडगावात पहाटे घडली घटना || 10 तोळे लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन करून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कुटुंबाला तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. नगर – पुणे रस्त्यावर केडगाव उपनगरात हॉटेल कोकणकिंगपासून पुढे 50 मीटरवर रविवारी (दि. 26) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी तीन लाख 72 हजारांचे सुमारे 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ सरथी पटनाईक (वय 42 रा. हंडेवाडी रस्ता, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ते पत्नी व मुलांसह त्यांच्या कारमधून शनिवारी (दि. 25) दुपारी दोन वाजता पुणे येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.

- Advertisement -

शिर्डी येथून दर्शन करून ते रात्री साडेदहा वाजता पुणे येथे जाण्यासाठी निघाले. रविवारी पहाटे दीड वाजता त्यांनी केडगावातील कोकणकिंग हॉटेलमध्ये जेवण केले. जेवण करून पुण्याच्या दिशेने निघाले असता हॉटेलपासून 50 मीटरवर त्यांनी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी कार थांबवली. फिर्यादी, पत्नी व मुलगा कारच्या खाली उतरताच तीन अनोळखी त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने फिर्यादीला चाकू दाखवून पाचशे रुपये मागितले. दुसरा व्यक्ती पत्नीजवळ गेला व त्याने चाकूचा धाक दाखवून रोकड व दागिन्यांची मागणी केली. पैसे व दागिने दिले नाही तर तुमचे काही खरे नाही असे म्हणून तिसर्‍या व्यक्तीने फिर्यादीच्या पत्नीकडील दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मंगळसूत्र, तीन सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे तीन लाख 72 हजारांचा 10 तोळ्यांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला.

तिघे रात्रीच्या अंधारात नगरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान पहाटेच्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंब घाबरले. त्यांनी कारमधून पुणे गाठले. दुसर्‍या दिवशी फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जानकर करत आहेत.

चार दिवसांत दुसरी घटना
गेल्या बुधवारी (दि. 22 मे) लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन मित्रांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना नगर – दौंड रस्त्यावरील कायनेटीक कंपनीसमोर घडली होती. अक्षय मारूती नाडे (वय 25 हल्ली रा. विद्यानगर, नगर – दौंड रस्ता, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लागलेला नसतानाच पुन्हा तशाच प्रकारची घटना केडगाव उपनगरात घडली आहे. प्रवासादरम्यान रस्त्यात थांबल्यास लुटमार करणारी टोळी सक्रिय असून त्या टोळीला अटक करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या