Monday, May 27, 2024
Homeनगरतीन कंत्राटदार व तीन विभाग बदलले तरी नगर-सावळीविहीर रस्त्याची दुर्दशा थांबेना

तीन कंत्राटदार व तीन विभाग बदलले तरी नगर-सावळीविहीर रस्त्याची दुर्दशा थांबेना

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

गेल्या पाच वर्षांत तिन सरकारे, रस्त्याचे तिन विभाग व काम करणारे तिन कंत्राटदार बदलले तरीही नगर सावळीविहीर या महामार्गाची दुरवस्था हटण्याचे नाव घेत नाही. टेंडर होऊन जवळपास सहा महिने उलटून गेले मात्र अद्यापही महामार्गाचे काम सुरु न झाल्याने या पावसाळ्यातही रस्ता पूर्ण होईल अशी शक्यता वाटत नाही. खोदलेल्या साईट पट्ट्या अर्धवट ठीगळे दिलेला खड्डेमय रस्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

- Advertisement -

नगर सावळीविहीर रस्ता सुरवातीला जागतिक बँक प्रकल्पाकडे होता. त्यानंतर चौपदरीकरणासाठी सुप्रीम इन्फ्रांस्ट्रक्चर या खाजगी कंपनी कडे काम आले. उच्च न्यायालयाने टोल बंद केल्याने हा ठेकेदार मधेच पळाला. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग करण्यात आला असुन अशा तिन विभागांमधुन फिरलेला, मात्र कधीच चांगल्या दर्जाचे काम न झाल्यामुळे नगर सावळीविहीर रस्ता प्रवाशांसाठी कायमच मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

दरम्यानच्या काळात राज्यातही गेल्या साडेचार वर्षात सुरुवातीला पवार फडणीस सरकार त्यांनतर मविआ सरकार आले त्यानंतर वर्षभरापूर्वी राज्यात पुन्हा शिंदे फडणीस सरकार आले आहे. साडेचार वर्षात राज्यात तिन सरकार आले मात्र या रस्त्याच्या बाबतीत अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने या महामार्गाचे पुरते वाटोळे झाले आहे. एवढेच काय कमी होते म्हणुन गेल्या चार पाच वर्षात या रस्त्याच्या कामासाठी नियुक्त केलेले तिन ठेकेदारही काम अर्धवट सोडून पळाले आहेत. यामध्ये सुरुवातीला राज्य महामार्गाकडे रस्ता असतांना सुप्रीम इन्फास्ट्रक्चर कंपनीने रस्ता अर्धवट सोडुन पलायन केले. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च केला. नंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. या विभागाकडून रस्त्याची टेंडर देण्यात आले मात्र साईड पट्ट्या खोदून व बर्‍याच ठिकाणी एक बाजूचा रस्ता खोदुन ठेवून काम अर्धवट सोडुन हा दुसराही कंत्राटदार पळून गेला.

गेल्या दोन-तीन वर्षापासून यामुळे रस्त्यावर प्रचंड अपघात घडत आहेत.अनेकांना यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. विभागाने गेल्या वर्षी या कामासाठी जवळपास पावणे सातशे कोटीचे टेंडर काढले होते.रुद्राणी कंस्ट्रक्शन कंपनीने हे टेंडर घेतले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला या कामाची निविदा अंतिम करण्यात आली होती. या प्रक्रियेला जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहेत. अद्यापही संबंधित कंत्राटदाराने महामार्गाचे काम सुरू केले नाही. हा तिसरा कंत्राटदार कधी काम सुरु करणार व त्या कामाची पुर्तता करणार याकडे प्रवांशाचे लक्ष लागुण आहे. मात्र सुरु असलेल्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खोदुन ठेवलेल्या साईड पट्टया व रस्त्यावरील मोठमोठे खड्डे प्रवाशांचा अंत पाहत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालूनच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या