Saturday, July 27, 2024
Homeनगर‘दक्षिणे’च्या मैदानात थोरात की गडाख ?

‘दक्षिणे’च्या मैदानात थोरात की गडाख ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना नगर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघातील चाचपणीला महाविकास आघाडी म्हणजेच भाजपाविरूद्ध एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने वेग दिला आहे. राखीव शिर्डी मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव अग्रक्रमावर आहे. दक्षिण (नगर) मतदारसंघही ठाकरेंच्या गटाकडे देण्यासंदर्भातील शक्यता पडताळून पाहिली जात आहे. या मतदारसंघात काँग्रेस समर्थकांनी आधीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची राळ उडवून दिलेली असताना ठाकरे सेनेकडून माजी मंत्री शंकरराव गडाखांसाठी चाचपणी सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘हॉटसीट’ ठरणार्‍या दक्षिण मतदारसंघात 2024 मध्ये राजकीय ‘घमासान’ होण्याची शक्यता वाढली आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आहे. देशभरात राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. एनडीए विरूद्ध इंडिया आघाडीत होणारी लढत आतापासून चर्चेत आहे. एकेक मतदारसंघासाठी स्वतंत्र रणनिती आखली जात आहे. जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर या दोन्ही मतदारसंघांसाठी आघाडीतील घटक पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाकरे सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सातत्याने दोन्ही मतदारसंघांचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जात आहे. प्रदेश पातळीवर आघाडीतील मातब्बर नेते मतदारसंघनिहाय ‘गणित’ कसे बसवायचे, याची आखणी करत आहेत. शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रवेश देवून ठाकरे सेनेने उमेदवारीचे संकेत दिल्याचे मानले जाते. मात्र ‘दक्षिणे’तही ठाकरे सेनेचा खासदार निवडून आणावा यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आग्रही आहेत.

उमेदवारीबाबत पक्षात चाचपणी वेगात आहे. सध्या यासाठी ठाकरे गटात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव चर्चेत आहे. दक्षिण मतदारसंघात राजकीय लढाईची ‘परंपरा’ लक्षात घेता गडाख कुटुंबातून उमेदवार असावा, असा आग्रह काहींनी ठाकरेंकडे धरल्याचे समजते. आघाडीतील घटक पक्षाच्या एका मातब्बर नेत्याने ठाकरे सेनेच्या थिंकटँककडे गडाखांचे नाव सुचवले. ‘नगर दक्षिण आणि गडाख’ यासंर्भात विस्तृत माहिती त्यांनी दिल्याचे म्हटले जाते. आधी उदयन गडाख यांच्या नावाबाबत चर्चा झाली. मात्र पक्षनेतृत्व आणि महाविकासआघाडातील ‘ज्येष्ठ’ नेतृत्व शंकरराव गडाख यांच्या नावावर औपचारिकरित्या सहमत असल्याचे समजते. दक्षिण मतदारसंघातील नेत्यांशी गडाखांचे कौटुंबिक ‘संबंध’ कामात येतील, असा विश्वास ठाकरे सेनेला असल्यानेच ही राजकीय कवायत करण्याचे घाटत असल्याची चर्चा आहे.

सध्या या मतदारसंघासाठी काँग्रेसमधूनही उमेदवारीच्या चर्चेचे वारे वाहत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाने राजकीय राळ उडवून दिली आहे. कामाच्या निमित्ताने खुद्द थोरात यांच्या ‘दक्षिण’ वार्‍या वाढल्या आहेत. थेट नकार किंवा थेट होकार टाळत थोरातांनी या चर्चेतील सस्पेंस अधिक वाढवला आहे. त्यांच्या ‘दक्षिण’ भेटीगाठीत लोकसभेच्या स्थितीबाबत ग्राऊंड रिपोर्ट घेत राजकीय जुळवणीसाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांचे समर्थक मान्य करत आहेत.

ही जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून लढविली जाते. पक्ष फुटीनंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गणिते बदलली. पक्षफुटीआधी या मतदारसंघासाठी शरद पवारांकडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांना ताकद दिली जात होती. मात्र तेच अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवार गटासमोरही उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण मतदारसंघात तोला‘मोला’चा उमेदवारच लढत देवू शकतो, याची आघाडीच्या सर्वच नेत्यांना स्पष्ट कल्पना आहे. त्यामुळे सर्वार्थाने ‘प्रबळ’ व आघाडीतील घटक पक्षांसोबत मदतीसाठी तयार असलेल्या स्थानिक ‘अदृश्य हातां’ची सहमती असलेला उमेदवार पुढे करण्याच्या रणनितीवर खल केला जात आहे. लोकसभा मतदारसंघ बदलाच्या तडजोडी करण्याची तयारीही आघाडीतील घटक पक्षांनी ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला. दरम्यान, ‘विद्यमान’ कारभारावर नाराज काही अन्यपक्षीय नेते महाविकास आघाडीतील या हालचालींमुळे उत्साहित झाले आहेत. यापुढे काय घडामोडी घडणार, याविषयी राजकीय उत्सुकता वाढली आहे.

…तर इतिहासाची पुनरावृत्ती

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ 1991 च्या लोकसभा निवडणुकीतील विखे-गडाख लढतीमुळे देशभर चर्चेत आला. आज 30 वर्षानंतरही या मतदारसंघाची चर्चा निघाली की बाळासाहेब विखे पाटील विरूद्ध यशवंतराव गडाख यांच्यातील लढत व त्यानंतरचा आचारसंहिता भंग खटला आठवला जातो. सध्या भाजपचे डॉ.सुजय विखे पाटील या मतदारसंघातून खासदार आहेत. या दोन्ही परिवारांतील नव्या पिढीने राजकीय कटुता मागे सोडत संवाद स्थापित केला आहे. मात्र ठाकरे गटाच्या मनसुब्यानुसार महाविकास आघाडीकडून माजी मंत्री शंकरराव गडाखांना मैदानात उतरवल्यास पुन्हा एकदा विखे-गडाख सामना पाहण्यास मिळणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या