अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्जप्रकरणात अडकलेल्या तीन कर्जदारांच्या अटकेस सत्र न्यायालयाने पोलिसांना परवानगी दिली आहे. कर्जदार सचिन दिलीप गायकवाड, शीतल शिवदास गायकवाड आणि आशुतोष सतीश लांडगे यांना अटक करण्यासाठी न्यायालयाने ही परवानगी दिली. या तिघांविरूध्द नवीन कलमांची वाढ करण्यात आली आहे. नगर कोर्टात दाखल गुन्हा क्रमांक 121/2022 संदर्भात सध्या स्पेशल केस क्र. 92/2024 चे कामकाज सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. मंगेश दिवाणे व फिर्यादी व ठेवीदारांच्या बाजूने अॅड. अच्युत पिंगळे काम पाहत आहेत.
यापूर्वी सचिन गायकवाड, शीतल गायकवाड आणि आशुतोष लांडगे या तिघांना न्यायालयाने जामिनावर सोडले होते. मात्र, तपासात नवीन माहिती हाती लागल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र संरक्षण अनियमित ठेवीदार (एमपीआयडी) अधिनियमांतर्गत कलम 3 आणि 4 आंतर्भूत करण्यात आले. या नवीन कलमांखाली अटक होण्याची शक्यता असून, यासंदर्भात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्यामुळे अटकेची परवानगी मिळाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. तथापि, न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदीप राम वि. झारखंड स्टेट – 2019 या निकालाचा आधार घेत, आधीचा जामीन रद्द न करता, नवीन कलमान्वये अटकेची परवानगी तपासी अधिकार्यांना दिली.
बँकेत आपले पैसे अडकलेले असलेल्या ठेवीदारांचे आता या खटल्याच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले असून, पोलिसांनी अटक करत पुढील तपास कसा पुढे नेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे.