Saturday, July 27, 2024
Homeनगरठेवीदारांच्या मोर्चाचे नियोजन पूर्ण; घोटाळेबाजाच्या नावे डफडे वाजवणार

ठेवीदारांच्या मोर्चाचे नियोजन पूर्ण; घोटाळेबाजाच्या नावे डफडे वाजवणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बँकींग परवाना रद्द झाल्याने कोट्यवधीच्या ठेवी अडकलेल्या नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्याचे ठरवले आहे. येत्या 26 रोजी पंतप्रधान मोदी शिर्डीला येणार असल्याने तेथे त्यांची भेट घेतली जाणार आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या आज बुधवारी निघणार्‍या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, दुसर्‍या टप्प्यात बँकेचे घोटाळे घालणार्‍या संचालक व अधिकारी यांच्या घरासमोर डफडे बजाव आंदोलनाचेही नियोजन आहे.

- Advertisement -

अर्बन बँकेचा बँकींग परवाना मागील 4 ऑक्टोबरला रद्द झाल्याने बँकेचे व्यवहार बंद झाले आहेत. 5 लाखा आतील ठेवीदारांचे 42 कोटी व 5 लाखांवरील ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. बँकेचा रद्द केलेला परवाना पुन्हा बहाल करावा व त्यासंदर्भातील अपिल दाखल होईपर्यंत बँकेवर अवसायक नेमू नये, या मागणीसाठी सत्ताधारी केंद्रीय सहकार निबंधकांकडे पाठपुरावा करीत आहेत व दुसरीकडे ठेवीदार त्यांचे पैसे मिळावेत म्हणून आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुकतीच बैठक घेऊन उद्या बुधवारी मोर्चाचे नियोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 रोजी शिर्डीला येणार आहेत. शिर्डी साई संस्थानच्या नव्या दर्शन रांगेचे उद्घाटन तसेच निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचा शुभारंभ त्यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या वेदना त्यांच्यासमोर मांडण्याचा विचार सुरू आहे. उद्याचा मोर्चा झाल्यानंतर त्याबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे समजते. नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेटचा परवाना चुकीची पध्दत वापरून दिल्यामुळे एका चांगल्या संस्थेचा बळी कसा गेला यासंबंधी मोदींना निवेदन द्यावे व या सर्व कटकारस्थानाची सखोल चौकशी व्हावी, दोषींना कडक शासन करण्यात यावे, प्रसंगी सदोष मनुष्यवधाचा दोष ठेवून शासन व्हावे व भविष्यात इतर कोणत्याही संस्थेबाबत असे घडू नये, अशा स्वरूपाचे निवेदन पंतप्रधानांना द्यावे, अशी अपेक्षा सभासदांनी व ठेवीदारांनी केल्याने त्याचा विचार सुरू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या