Friday, May 31, 2024
Homeनगरनगर अर्बनच्या संचालकांच्या घरासमोर डफडे नाद

नगर अर्बनच्या संचालकांच्या घरासमोर डफडे नाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेचे मुख्यालय व नगर शहरात राहणार्‍या बँकेच्या काही संचालकांच्या घरासमोर मंगळवारी ढोल-ताशा व डफड्याचा गजर झाला. बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसलेल्या कर्जतच्या ठेवीदारांनी हे आंदोलन करून त्यांच्या हक्काच्या ठेवींचे पैसे तातडीने परत देण्याची मागणी केली. दरम्यान, ठेवीदारांचे उपोषण आंदोलन मंगळवारी दुसर्‍या दिवशीही सुरू होते.

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या कर्जत-जामखेड परिसरातील ठेवीदारांची सुमारे दहा कोटींची रक्कम बँकेत अडकली आहे. रिझर्व बँक परवानगी देत नाही, त्यामुळे पैसे देता येत नाही, असा दावा बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया व संचालक मंडळ सदस्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्जत- जामखेडच्या ठेवीदारांनी सोमवारपासून बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात महेश जेवरे, सुनील कोठारी, संजय कुंभार, बाळासाहेब पठारे, देवेंद्र विभुते, संदीप सुपेकर, स्वप्निल पितळे, सचिन भंडारी, सुशील शिंदे, मारुती गोलेकर, अशोक लोळगे, अरविंद काळोखे आदींसह अनेक ठेवीदार सहभागी झाले आहेत. अध्यक्ष कटारिया यांच्यासह काही संचालकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन एक एप्रिल 2024 नंतर ठेवीदारांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ते आंदोलकांनी अमान्य केले व उपोषण सुरूच ठेवले. बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सर्व ठेवीदारांचे पैसे देण्याची बँकेची तयारी आहे. मात्र, रिझर्व बँकेच्या बंधनामुळे मर्यादा आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत बँकेचे मायनस नेटवर्थ चांगली वसुली करून नेटवर्थ प्लसमध्ये आणून एक एप्रिल 2024 नंतर ठेवीदारांना पैसे देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आंदोलकांना दिले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी ठेवीदारांच्या दोन प्रतिनिधींसह रिझर्व बँकेच्या अधिकार्‍यांची भेट घेण्याची व त्यावेळी ठेवीदारांना कमीत कमी 25 ते 50 टक्केपर्यंत ठेवी परत देण्याबाबत रिझर्व बँकेला ठेवीदारासमक्ष विनंती करण्याची ग्वाही दिल्याने उपोषण स्थगित केले गेले.

ठेवीदारांमध्ये जागृती फेरी

या उपोषण आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी 8 ऑगस्टला उपोषणकर्त्यांनी ठेवीदारांमध्ये जनजागृती व संचालकाविरुद्ध झोपमोड आंदोलन केले. बँकेच्या मुख्यालयासमोर डफडे व ढोल-ताशाचा गजर करून कापड बाजारात फेरी मारली व ठेवीदारामध्ये जागृती केली. बँकेत अडकलेले हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर संचालकांच्या घरासमोर डफडे बजाव व झोपमोड आंदोलन करण्यात आले. संचालक ईश्वर बोरा, उपाध्यक्ष दीप्ती गांधी, संपत बोरा आदींच्या घरासमोर हे आंदोलन झाले. आंदोलकांनी ढोल-ताशा व डफडे वाजवत जोरदार घोषणाबाजी केली. बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया तसेच संचालक मंडळ सदस्य शैलेश मुनोत, गिरीश लाहोटी, अजय बोरा, अनिल कोठारी व अन्य संचालकांची नावे घेऊन त्यांचा निषेध केला. कापड बाजार, मार्केट यार्ड, धार्मिक परीक्षा बोर्डमार्गे मार्केट यार्ड चौकात येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व माळीवाडा विशाल गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बँकेच्या मुख्यालयासमोर समारोप करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या