अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बँकींग परवाना रद्द झालेल्या नगर अर्बन बँकेतील कर्ज फाईलींसह कागदपत्रांची पडताळणी करून ते ताब्यात घेण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सुरूवात केली. बँकेत घडलेल्या आर्थिक घोटाळ्यांबाबतचा फॉरेन्सिक अहवाल पूर्ण झाला असून, या अहवालानुसार जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. फॉरेन्सिक ऑडिट करणारे अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून बँकेतील कर्ज फाईली, कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सोमवारी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी काही फाईल जप्त करण्यात आल्या असून आजही (मंगळवार) ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिसांत फिर्याद देऊन 28 कर्ज प्रकरणांत सुमारे दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केल्यावर व त्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आल्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय घेतला होता व मागील 16 महिन्यांपासून त्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे व या अहवालात नमूद बाबींच्या अनुषंगाने बँकेतील विविध कर्जखात्यांची कागदपत्रे व अन्य अनुषंगीक फाईल्स आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
बँकेने 28 कर्जप्रकरणांत कमी तारण घेतले, वाढीव कर्ज दिले व अन्य विविध बाबींच्या माध्यमातून दीडशे कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार माजी संचालक गांधी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पोलिसांकडे केली होती. पण पोलिसांनी दखल घेतली नसल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. अखेर खंडपीठाने आदेश दिल्याने पोलिसांनी फेब्रुवारी 2022 मध्ये गांधी यांची तक्रार दाखल करून घेतली. तिच्या तपासात व्याप्ती वाढत असल्याचे पाहून मुंबई येथील डी. जी. ठकराल कंपनीवर फॉरेन्सिक ऑडीटची जबाबदारी सोपवली. या कंपनीच्या पथकाने बँकेचे ऑडीटर, कर्मचारी व अधिकारी, कर्जदार व अन्य काहींचे जबाब नोंदवले आहेत तसेच काही कागदपत्रांचीही तपासणी केली आहे.
यातून 65 प्रकरणांमध्ये घोटाळे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. मागील 16 महिन्यांपासून सुरू असलेले हे फॉरेेन्सिक ऑडीट आता पूर्ण झाले असून, पोलिसांद्वारे त्याचा अभ्यास सुरू आहे व या अभ्यासाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे बँकेतून ताब्यात घेण्यासही सुरूवात झाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्या दोषींच्या गळ्यातील कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.