Friday, November 22, 2024
Homeनगरअर्बन पोलीस तपास प्रकरणावर राजकीय शक्तीचा दबाब

अर्बन पोलीस तपास प्रकरणावर राजकीय शक्तीचा दबाब

बँक बचाव कृती समितीचा आरोप || जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलीस तपासावर राजकीय शक्तीचा दबाव असल्याने तपास धीम्यागतीने सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत आरोपी असलेले बँकेचे संचालक, कर्जदार अशांच्या 48 मालमत्ता जप्त केल्या. मात्र त्याची जप्ती व लिलाव प्रक्रियेसाठी त्या अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवल्या गेल्या नाहीत. परिणामी ठेवीदारांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीने केला आहे.

- Advertisement -

बँकेच्या सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी हा आरोप केला. यावेळी अ‍ॅड. अच्युत पिंगळे, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते. पोलिसांची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी दिवाळीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा नेला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बँकेतील कर्जगैरव्यवहार व घोटाळ्याचा गुन्हा दाखल होऊन अडीच वर्षांचा अधिक कालावधी झाला, मात्र मफॉरेन्सिक ऑडिटफनुसार निष्पन्न झालेल्या 105 आरोपींपैकी केवळ 10 ते 12 जणांना अटक झाली आहे. आरोपींमध्ये बँकेच्या अनेक अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांनी येत्या आठ दिवसात पोलिसांना शरण यावे, असेही आवाहन त्यांनी केले. बँक बँक बंद पडून जवळपास एक वर्षाचा कालावधी झाला.

मात्र नगर पोलीस दलाकडून कोणतीच गंभीर व आश्वासकृती होत नाही. 48 मालमत्ता जप्त करण्यात आल्या तरी त्यावर अन्य वित्तीय संस्थांचे बोजे आहेत का, याचा शोध घेण्याचे काम अत्यंत दिरंगाईने सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बँकेचे संचालक व मोठे धनदांडगे कर्जदार यांच्या स्थावर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले, मात्र त्याच्या जप्तीसह लिलाव प्रक्रिया होण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बँक बचाव समिती सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवले, असे स्पष्ट करून कुलकर्णी यांनी सांगितले की, बँकेच्या कर्जाची थकबाकी लवकर वसूल करणे, ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा व भागभांडवल परत करून नव्याने भागभांडवल व ठेवी मिळून अर्बन बँक पुन्हा उभी राहू शकते, हेच समितीचे ध्येय आहे.

बँक प्रशासनाकडून 600 कोटी, ठेवीदार विमा योजनेअंतर्गत 293 कोटी, असे एकूण 893 कोटी रुपये ठेवीदारांना परत मिळाले आहेत. लवकरच आणखी 63 कोटी रुपये ठेवीदारांना मिळतील. मात्र अद्याप 5 लाखावरील 213 कोटी व 5 लाखाखालील 44 कोटी असे सुमारे 250 कोटी रुपये ठेवीदारांची अडकलेले आहेत. बँकेच्या अवसायकांनी आतापर्यंत 41 कोटी रुपये वसूल केले आहेत. एकूण कर्ज येणे 363 कोटी व त्यावरील व्याज असे एकूण 900 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत.

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 292 कोटींचा घोटाळा निदर्शनास आला असला तरी प्रत्यक्षात घोटाळा 400 कोटींचा आहे. बँकेचे दिवंगत अध्यक्ष दिलीप गांधी यांनी राजकीय वजन वापरून कुटुंबासह गैरव्यवहार केला, असा आरोप करून डी. एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, येत्या काही दिवसात मोठ्या थकबाकीदार कर्जदारांची यादी वृत्तपत्र व बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या