अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर 2023 मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये 20 जुलैअखेर बँकेच्या एकुण कर्जापैकी रुपये 30 कोटी 86 लाख वसूल करण्यात आले आहेत. थकीत कर्ज वसुलीला आणखी गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना 5 जून 2024 पासून सुरू केली आली आहे.
एकरक्कमी परतफेड योजनेस थकीत कर्जदारांचा प्रतिसाद मिळत असून ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी एका महिन्यांत 239 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 14 कर्जदारांनी आतापर्यंत 100 टक्के रक्कम रुपये 3 कोटी 89 लाख 29 हजार रुपये भरले आहेत. 5 कर्जदारांनी ओटीएसमध्ये ठरलेल्या अंतिम रकमेच्या 25 टक्के रक्कम रुपये 6 लाख 87 हजार रुपये भरली असून उर्वरित रक्कम देखील लवकरच ठरल्याप्रमाणे जमा होणार आहेत. त्याचबरोबर डीआयसीजीसीच्या तिसर्या क्लेमच्या माध्यमातून 17 हजार 424 ठेवीदारांना 63.15 कोटी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती एनसीडीसीचे संचालक तथा बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
न्यायालयाच्याआदेशानुसार तसेच पोलीस प्रशासनामार्फत देखील थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू असून सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, तसेच सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.