मुंबई, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या निवडणूक रणधुमाळीला अखेर सुरूवात झाली. काल मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यात 11 नगरपरिषद व 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होऊन दुसर्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात 12 नगराध्यक्षांसह 289 नगरसेवक या निवडणुकीतून निवडले जाणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेमधून होणार आहे.
जिल्ह्यात ‘ब’ वर्ग असलेल्या श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तीन नगरपरिषदांसह ‘क’ वर्गच्या जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी नगरपरिषदा तर एकच नेवासा नगरपंचायतची निवडणूक होत आहे. जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून नगरपरिषदांच्या निवडणूक रखडल्या आहेत. त्यात श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव या नगरपरिषदांच्या तर नेवासा नगरपंचायतीची निवडणूक दोन वर्षापासून झाली नाही. आता या सर्वच नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिर्डी नगरपरिषदेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीला विशेष महत्व आले आहे.
या निवडणुकीसाठी 4 लाख 51 हजार 287 मतदार असून त्यासाठी 502 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबर निवडणूक अधिसूचना जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने मंगळवारपासून नगरपरिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे.
11 नगरपरिषदेमध्ये व्दिसदस्य निवडणूक होत असून नगरपंचायतमध्ये एक सदस्य निवडला जाणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतची प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे आहे. श्रीरामपूर- 17, कोपरगाव- 15, संगमनेर- 15, जामखेड- 12, राहाता- 10, शेवगाव- 12, राहुरी- 12, श्रीगोंदा- 11, पाथर्डी- 10, देवळाली प्रवरा- 10, शिर्डी- 12, नेवासा नगरपंचायत- 17.
नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकीच्या तारखा
10 नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
17 नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
18 नोव्हेंबर – उमेदवारी अर्जाची छाननी
21 नोव्हेंबर – अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
25 नोव्हेंबर – अपील असलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारीची शेवटची मुदत
2 डिसेंबर – मतदान (सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत)
3 डिसेंबर – मतमोजणी (सकाळी 10 वाजल्यापासून)
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
अ वर्ग नगरपालिका : थेट नगराध्यक्ष- 15 लाख रुपये, सदस्य- 5 लाख रुपये
ब वर्ग पालिका : थेट नगराध्यक्ष- 11 लाख 25 हजार, सदस्य -3 लाख 50 हजार
क वर्ग पालिका : थेट नगराध्यक्ष- 7 लाख 50 हजार, सदस्य- 2 लाख 50 हजार
नगरपंचायत : थेट नगराध्यक्ष- 6 लाख रुपये, सदस्य – 2 लाख 25 हजार रुपये
नगराध्यक्षपदाचे आरक्षण
शिर्डी- अनुसूचित जाती महिला, राहुरी- अनुसूचित जमाती, कोपरगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाथर्डी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, राहाता- नागरिकांचा मागास प्रवर्ग, संगमनेर- सर्वसाधारण महिला, जामखेड- सर्वसाधारण महिला, शेवगाव- सर्वसाधारण महिला, देवळाली प्रवरा- सर्वसाधारण व्यक्ती, श्रीगोंदा- सर्वसाधारण व्यक्ती, श्रीरामपूर- सर्वसाधारण व्यक्ती, नेवासा नगरपंचायत- सर्वसाधारण व्यक्ती.
नगरपरिषद व नगरपंचायत मतदार संख्या
शिर्डी (33 हजार 613), राहुरी (33 हजार 269), कोपरगाव (63 हजार 453), पाथर्डी (23 हजार 242), राहाता (19 हजार 465), संगमनेर (57 हजार 714), जामखेड (33 हजार 161), शेवगाव (35 हजार 479), देवळाली प्रवरा (23 हजार 861), श्रीगोंदा (28 हजार 326), श्रीरामपूर (80 हजार 992), नेवासा नगरपंचायत (18 हजार 712).
मतदान केंद्र संख्या
शिर्डी- 36, राहुरी- 35, कोपरगाव- 75, पाथर्डी- 26, राहाता- 21, संगमनेर- 61, जामखेड- 37, शेवगाव- 38, देवळाली प्रवरा- 26, श्रीगोंदा- 36, श्रीरामपूर- 90, नेवासा नगरपंचायत- 21
नगरपरिषदांची नगरसेवक संख्या
शिर्डी- 23, राहुरी- 24, कोपरगाव- 30, पाथर्डी- 20, राहाता- 20, संगमनेर- 30, जामखेड- 24, शेवगाव- 24, देवळाली प्रवरा- 21, श्रीगोंदा- 22, श्रीरामपूर- 34, नेवासा नगरपंचायत- 17.
मतदारांसाठी नवीन मोबाईल अॅप
मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल अॅप विकसित केले आहे. मोबाईल पच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या अॅपमधून मिळू शकेल.
एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित
नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. त्याचबरोबर थेट नगराध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणत: एका मतदाराने दोन ते तीन जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठी; तर दुसरे मत थेट नगराध्यक्षपदासाठी द्यावे लागेल.
दुबार मतदारांना शोधण्यासाठी टूल तयार
दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून रान पेटवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. टूल विकसित करून संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्याची चौकशी निवडणूक अधिकारी घेतील आणि तो कुठे मतदान करणार याची आधीच माहिती घेतली जाईल. जे मतदार याला प्रतिसाद देणार नाहीत ते मतदान करण्यास आल्यास त्यांच्याकडून डिक्लेरेशन भरून घेतले जाईल.
आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचायतच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कालच (ता. 4 नोव्हेंबर 2025) दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
झेडपी, पंचायत समिती निवडणुका कधी ?
नगरपालिका व नगरपंचायतसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होणार असून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी डिसेंबरमध्ये मतदान घेतले जाईल, अशी शक्यता आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागात मदतकार्यात व्यस्त असल्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. इकडे सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक निवडणुकीसाठी सज्ज आहेत.
बँका-पतपेढ्यांच्या व्यवहारांवर लक्ष, मद्य विक्रीवरही करडी नजर
आचारसंहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशांबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्यांच्या व्यवहारावर लक्ष असणार आहे. व्हेईकल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं निवडणूक आयोगानं यावेळी म्हटलं आहे, निवडणूक काळामध्ये मद्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते, या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभाग आणि पोलिसांची यावर करडी नजर असणार आहे, कुठेही अनुचित प्रकार आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
येत्या 12 आणि 13 नोव्हेंबरला काँग्रेसची पार्लिमेंट्री बोर्डाची बैठक
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होताच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्याची तारीख देखील काँग्रेसने निश्चित केली आहे. येत्या 12 आणि 13 नोव्हेंबरला काँग्रेसची पार्लिमेंट्री बोर्डाची बैठक झाली आहे. या बैठकीत केली नगर परिषद आणि नगरपंचायतला सामोरे जाणार्या उमेदवारांच्या यादींची चर्चा आणि निवड केली जाणार आहे. याच दोन दिवसात पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना सुरू केली आहे.
कट्ट्या कट्यावर चर्चा रंगली
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीची राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आल्याने आता निवडणूक वातावरण तापू लागले आहे. यावर्षी कोण उभे राहणार? कोण नगराध्यक्षपद पटकावणार? याचीच चर्चा रस्त्यावर, बाजारात आणि चौकात रंगू लागली आहे. घराघरात, कट्ट्यांवर आणि चहाच्या टपरीवर भविष्यवाण्या व गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे.
उमेदवारी ऑनलाईन भरता येणार, सोबत जात प्रमाणपत्र अनिवार्य
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasecelec.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत स्वाक्षरी करून संबंधित निवडणूक अधिकार्याकडे दाखल करणे आवश्यक राहील, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. राखीव प्रभागातून निवडणूक लढवणार्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत दाखल करावे लागेल. जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती उमेदवाराला जोडावी लागेल, असे वाघमारे यांनी सांगितले.




