नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.२१) रोजी मतमोजणी पार पडत असून, जिल्ह्यात महायुतीने मुसंडी मारली आहे.
यात सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमोद चोथवे यांचा पराभव केला. चोथवे यांना ९ हजार ३०२ मते मिळाली. तर उगले यांना १४ हजार ९०४ मते मिळाली. त्यामुळे चोथवे यांचा ५६०२ मतांनी पराभव झाला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांना ४ हजार ८५९, शिंदेसेनेचे नामदेव लोंढे यांना ७ हजार २६२ मते मिळाली.
दरम्यान, या निवडणुकीत खासदार राजभाऊ वाजे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षाचे उमेदवार प्रमोद चोथवे आणि भाजपचे उमेदवार व खासदार वाजेंचे काका हेमंत वाजे यांचा पराभव झाला आहे.
सिन्नरला मंत्री-खासदार लढत
सिन्नरच्या नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते तरी पक्षीय उमेदवारांसाठी माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे व उदय सांगळे यांनी येथील लढत प्रतिष्ठेची केली होती.
नगराध्यक्षपदाचे विजयी झालेले उमेदवार
पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे – भाजप
ओझर – अनिता घेगडमल – भाजप
चांदवड – वैभव बागुल -भाजप
इगतपुरी – शालिनी खातळे – शिंदे सेना
नांदगाव – सागर हिरे – शिंदे सेना
सटाणा – हर्षदा पाटील -शिंदे सेना
त्र्यंबकेश्वर – त्रिवेणी तुंगार – शिंदे सेना
मनमाड – योगेश पाटील – शिंदे सेना
भगूर – प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी अजित पवार
येवला – राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी अजित पवार
सिन्नर – विठ्ठल उगले – राष्ट्रवादी अजित पवार




