नागपूर | Nagpur
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्य तापलेय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. अशातच नागपूरमध्ये १७ मार्चच्या रात्री २ गटात तुफान राडा झाला. नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. यानंतर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हिंसाचार झाल्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत २० ते २५ पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.
त्यांचे चेहरे स्कार्फने झाकलेले, हातात स्टिक्स, धारदार शस्त्रे
तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेवर बोलताना हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेने सांगितले की, “’जवळपास ३० ते ३५ लोक आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधून आले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या होत्या. त्यांनी गोंधळ सुरू केला, दुकानांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. यावेळी त्यांनी वाहनेही जाळली.”
दुचाकी, चारचाकी गाड्यांची तोडफोड
जमावाने एकदम गोंधळ सुरू केला. काही ठिकाणी आग लावली. धारदार शस्त्रांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. दुकानांची तोडफोड केली. यावेळी दुकाने बंद करण्यास सांगितले होते. त्यामुळे दुकानांचे फार नुकसान झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे’.
तेव्हा माझ्यावर दगडफेक करण्यात आली
दरम्यान हंसापुरी भागातील एका स्थानिक दुकानदाराने सांगितले की, “रात्री १०.३० वाजता मी माझे दुकान बंद केले. अचानक, मला लोक वाहने जाळताना दिसले. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यावर दगडफेक करण्यात आली. माझी दोन वाहने आणि जवळच उभ्या असलेल्या काही इतर वाहनांना जमावाने आग लावली.”
संचारबंदी लागू शाळा महाविद्यालय बंद
नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल, शिवाजी चौक, हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली असली तरी परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहेत. आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा