श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करणारा डंपर व पोकलेन पकडला. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे गोदावरी नदीपात्रात पोलिसांनी ही कारवाई केली.
नायगाव येथून नदीपात्रातून पोकलेन व डंपरमधून बेकायदेशिर वाळू चोरून नेली जात असल्याची गुप्त खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक़ अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे 1 पोकलेन व टाटा कंपनीचा हायवा डंपर वाळू चोरताना मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचा पोकलेन (मॉडेल क्र. आर-210/7 सिरीयल क्र. एन601 डी 04570) तसेच टाटा कंपनीचा हायवा डंपर ट्रक (नं. एमएच 20-8911) पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हायवा चालक अमोल बाबासाहेब कराळे (वय 31, रा. रोठीवस्ती, ता. वैजापूर) व पोकलेंट चालक अनुपकुमार मिश्रीप्रसाद (वय 24, रा. महाई बलिया चितबडागाव, उत्तरप्रदेश) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 379, 511, 34, पर्यावरण कायदा कलम 3/15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक़ अनिल कटके यांच्या सूचनेप्रमाणे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, सचिन अडबल, संदीप दरंदले, राहुल चोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरिक्षक़ मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.