Saturday, April 19, 2025
HomeनाशिकNashik News : राज्यात 'नैताळे बारव' चा बहुमान

Nashik News : राज्यात ‘नैताळे बारव’ चा बहुमान

जागतिक वारसा दिनानिमित्त पोस्ट कार्डवर महाराष्ट्रातील दोन बारवांच्या छायाचित्रांना मान

नैताळे। संजय साठे Naitale

जागतिक वारसा दिनानिमित्ताने अमिताभ सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांनी महाराष्ट्रातील 2 बारवांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यासाठी नैताळे येथील ऐतिहासिक बारवाचा समावेश झाल्याने यानिमित्ताने गावाला बहुमान मिळाला आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील मतोबा नगरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या नैताळे गावातील ही बारव नंदा प्रकारची एल आकाराची भव्य मोठ्या स्वरूपाची आहे. बारवेत उतरण्यासाठी एकाच बाजूने प्रवेश आहे. बारवेत देवकोष्ठे, कमानीयुक्त झरोके, विविध खोल्या असून मराठा कालखंडातील स्थापत्य शैलीचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

बारवेचे बांधकाम मल्हारी प्रतापी मल्हारराव होळकर यांचे सेवक गंगोबा चंद्रचूड यांनी शके 1669 प्रभव नाम सवंतसरात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी केले होते. या अमूल्य स्थापत्य शैलीचा प्रसार व्हावा, यासाठी मविप्र शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर प्राचार्य डॉ.प्राजक्ता बस्ते, प्रो.गीतांजली पाटील, प्रो.मेघा बुट्टे आणि प्रो. शर्मिष्ठा सुरजीवाले यांनी ही बाब पुरातन वास्तू विभागाकडे व शासनाच्या नजरेत आणल्याने तसेच वारसाप्रेमी संजय बिरार आदींनी बारवपाशी जावून त्याचे दस्तऐवजीकरण केले आणि वारसाप्रेमी करण सोनी यांनी ड्रोनवरून फोटो काढत नैताळेचा अमूल्य ठेवा भारत पोस्टल विभागाच्या माध्यमातून जगभर जाणार आहे.

महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत लोकसहभागातून आतापर्यंत 2029 बारव, पायर्‍यांच्या विहिरी, पुष्करणी, बावडी, कुंड, घोडेबाव, पोखरबाव यांचे गूगल मॅपवर मॅपिंग करण्यात आले आहे. महाराष्ट्रात चार प्रकारच्या बारव आहेत. यामध्ये नंदा बारव एक बाजूने प्रवेशद्वार, भद्रा बारव दोन बाजूने प्रवेशद्वार, जया बारव तीन बाजूने प्रवेशद्वार, विजया बारव चार बाजूंनी प्रवेशद्वार. बारव या व्यापारी मार्गावर, घाटवाटामध्ये, प्राचीन शिव मंदिर परिसरात, गावातील ग्रामदैवत मंदिर परिसरात, ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक मंदिर परिसरात, जुन्या वाड्यात, समाधीच्या बाजूला, यात्रा मार्गावर, दुष्काळी भागात आणि कित्येक गावात किमान एक बारव बांधल्या होत्या. या बारव चालुक्य, यादव, शिवकालीन अशा वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधल्या गेल्या आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रभर भरपूर बारव बांधल्या आहेत. महाराष्ट्रमध्ये नंदा बारव सर्वात जास्त आढळतात. त्यामध्ये देखील वेगवेगळे आकार आहेत. शिवपिंडी आकाराच्या आणि इंग्लिश मधल्या एल-आकाराच्या बारव बहुदा आढळतात. पण झेड-आकाराच्या बारव दुर्मिळ आहेत. विहिरीचे आकार हे वर्तुळाकार, आयताकृती, चौरस, षट्कोनी, अष्टकोनी असतात. नंदा बारव दगड किंवा विटांनी बांधल्या आहेत. काहीमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला कमान, देवळ्या आढळून येतात. काही भागात विहिरीमध्ये विश्रांतीसाठी खोली तयार केली आहे. अशा वैशिष्टयपूर्ण बारव तत्कालीन काळात महाराष्ट्रात उभ्या केल्या.

बारव मोहीमेचे ध्येय
संशोधन आणि संवर्धनाच्या उद्देशाने भारतातील बारवाचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह डेटाबेस तयार करणे. हजारो बारव चे गूगल मॅपिंग करणे. बारव चे छायाचित्र/ड्रोन शॉट्स. पायर्‍यांच्या विहिरींचे स्थापत्य दस्तऐवजीकरण. श्रमदानातून बारव स्वच्छता मोहीमचे आयोजन करणे आणि जतन-संवर्धन करणे. ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि पर्यटन विकास. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र बारव दीपोत्सव.
रोहन काळे, समन्व्यक, महाराष्ट्र बारव मोहीम

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईभक्ताकडून साईचरणी 68 लाख रूपयांचा सुवर्ण मुकुट दान

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांच्या खजाण्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने, चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान (Donation) साईभक्तांकडून जमा होत असून शनिवारी...