मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
केंद्रातील मोदी सरकारचा आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या. परंतु आरबीआयकडे (RBI) ७ हजार २५० दशलक्ष नोटाच पोहचल्या. याचाच अर्थ म्हणजे ८८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
नाशिक, देवास आणि बंगलुरुच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक आणि देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून नोटा थेट रिझर्व्ह बँकेकडे जातात आणि नंतर बाजारात चलनात येतात, ही प्रक्रिया आहे. मग या नवीन ५०० रुपयांच्या नोटा गायब कशा झाल्या? या कारखान्यात छापलेल्या नवीन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल ८८ हजार कोटी रुपये गेले कुठे? हा गंभीर प्रश्न आहे, असे पटोले म्हणाले.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे आधीच सांगितलेले आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर पाचशे आणि एक हजार रुपये मूल्यांच्या जुना नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. त्यावेळी १ हजार ६६० कोटी नोटा चलनात होत्या. पण रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा जमा झाल्या त्यावेळी २ लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्याची माहिती आहे. नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटा किती छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.