नांदेड । Nanded
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. मात्र, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायाला मिळाला.
चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी काही मोजक्या मतांनी विजय मिळवला. रवींद्र चव्हाण हे दिवसभर मतमोजणीत मागे होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुन्हा स्पर्धेत येत केवळ १४५७ मतांनी विजय मिळवला.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे उमदेवार प्रतापराव चिखलीकर यांचा ५९ हजार मतांनी पराभव केला, पण २६ ऑगस्ट रोजी वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली, या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमदेवारी घोषित केली. तर त्यांच्याविरोधात भाजपाने संतुक हंबर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
अतिशय अटीतटीची ही लढत होती. या निवडणकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात डॉ.संतुक हंबर्डे हे १६ हजार मतांनी आघाडी होते त्यामुळे भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गेम पलटला आणि काँग्रेसने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली, या निकालात रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा १४५७ मताधिक्याने पराभव केला. रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६७८८ मते मिळाली, तर डॉ.संतुक हंबर्डे यांना ५८५३३१ मत मिळाली.