शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यातील वरुर बुद्रूक येथील नंदिनी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि वाळू असा 5 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस पथकाने छापा टाकून ताब्यात घेतला. मात्र ट्रॅक्टर चालकाने पोबारा केला. पोलीसांनी ट्रॅक्टरचा मालक प्रफुल्ल भागवत झिरपे आणि अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरुर बुद्रूकच्या शिवारात नंदिनी नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वाळू ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्याने वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली.
त्यानुसार निरीक्षक मुटकुळे यांनी पोलीस पथक आणि पंच पाठवले. पथकाने नंदिनी नदीच्या बाजूला वरुर बुद्रूक येथे जाऊन खात्री केली. नदीच्या पात्रात ट्रॅक्टर दिसताच छापा टाकला. पोलीसांना पाहून ट्रॅक्टर ड्रायव्हर फरार झाला. मालक प्रफुल्ल झिरपे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, विशाल लहाने, नेताजी मरकड, परशुराम नाकाडे, भगवान सानप, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राहुल खेडकर, अर्जुन मुंढे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुडु यांनी केली.





