Saturday, June 29, 2024
Homeनंदुरबारमहिला तलाठीस मारहाणप्रकरणी तिघा संशयितांना अटक

महिला तलाठीस मारहाणप्रकरणी तिघा संशयितांना अटक

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

- Advertisement -

नंदुरबार येथे गौणखनिज तपासणी पथकाशी वाद घालून महिला तलाठीस मारहाण केल्याप्रकरणी तिघा संशयितांना शनिवारी रात्री उशिराने अटक करण्यात आली आहे. यामुळे तलाठी संघाकडून बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे समजले असून आजपासून कामकाज सुरळीत होणार असल्याची शक्यता आहे.

नंदुरबार येथे शनिवारी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या गौणखनिज तपासणी पथक वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी वाहन (क्र.एम.एच.39 एडी 0966) यातील चालकास वाळू वाहतूकीबाबत 10 टक्के खनिज विकास निधीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे पास आढळून आले नाही. यामुळे पथकातील कर्मचार्‍यांनी सदरचे वाहन तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले.

मात्र चालकाने वाहन तेथेच सोडून पसार झाला होता. दरम्यान, दीड तासानंतर मालक गौरव चौधरी व चालक यांच्यासह काही जणांनी येवून पथकातील कर्मचार्‍यांशी वाद घालून वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शासकीय वाहनाने गौणखनिज पथकातील कर्मचार्‍यांनी सदर वाहनाचा पाठलाग करुन मिरची पथारीजवळ वाहन अडविले. यावेळी गौरव चौधरी तलाठी निशा पावरा यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी नगरसेवक गौरव चौधरी यांनी तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करीत मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप श्रीमती पावरा यांनी केला आहे.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात अनुसूचित जाती जमाती कायद्याचा भंग, विनयभंग तसेच सरकारी नोकरावर हल्ला आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तिघा संशयितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. तसेच नंदुरबार तालुका तलाठी संघाकडून देखील तिघांना अटक होईपर्यंत कामबंदचा निर्णय घेत याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत संशयित गौरव प्रकाश चौधरी, काशिनाथ सोमनाथ गुरव व शुभम रविकुमार जाधव या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत महिला तलाठीस मारहाण केल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे. यामुळे आता कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल असे वर्तन करु नये. तसेच सद्यस्थितीत कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडून मनाई आदेश तसेच जमावबंदीचे आदेश लागू असल्याने नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी केले आहे. दरम्यान, तिघा संशयितांना अटक करण्यात आल्याने तलाठी संघाकडून बेमूदत कामबंद आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचे समजले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या