नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
दि.२३ जून रोजी नंदुरबार हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घोषित करण्यत येणार आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते याबाबतच्या फलकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, याच दिवशी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील हे दि. २३ जून २०२३ रोजी नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान ते नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे आढावा यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणार्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचा आढावा घेणार आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होवू शकेल अशी सूचना मांडली होती.
त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाया करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या मोहिमेचा शुभारंभ दि.१ मार्च २०२३ रोजी झाला.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा तसेच केलेल्या कारवायांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. याच दिवशी नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घोषीत करण्यात येणार आहे.
दि.२३ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.