नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar
नंदुरबार येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त आज शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा एक दिवसीय शिव चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी पंडित मिश्रा यांची नंदनगरितील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो शिवभक्तांना सहभाग घेतला. शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे शोभायात्रेने लक्ष वेधून घेतले.
माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरालगत असलेल्या शहादा बायपास रस्त्यावर १२५ बेडचे सुसज्ज छत्रपती मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचे आज पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी पं.मिश्रा यांचे हेलिकॉप्टरने जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. त्यानंतर त्यांची उघड्या वाहनातून शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत सुरुवातीला कलशधारी महिला होत्या.
तसेच डिजे, बँड पथक, ढोल ताश्याच्या गजर करण्यात आला. शहरातील चौका चौकात पंडित मिश्रा यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर हजारो शिवभक्त उपस्थित होते. त्यांनीही मिश्रा यांचे स्वागत केले. पंडित मिश्रा यांनी शिवभक्तांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास हॉस्पिटल चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटल शेजारी उभारण्यात आलेल्या सभामंडपात पं. मिश्रा यांनी शिवकथा सांगितली. यावेळी लाखो शिवभक्त उपस्थित होते. व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमारे, आ. राजेश पाडवी, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, ॲड. राजेंद्र रघुवंशी, मनोज रघुवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे, आदी उपस्थित होते.