Monday, May 27, 2024
Homeनगरनांदुर्खी चौफुलीवर अपघाताची मालिका पुन्हा सुरू

नांदुर्खी चौफुलीवर अपघाताची मालिका पुन्हा सुरू

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक गावातूनच शिर्डी विमानतळाकडे जाणार्‍या मार्गावर नेहमी साईभक्तांच्या वाहनांची गर्दी असते. तर याच चौकातुन राहाता-सिन्नर महामार्ग गेल्याने प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे नांदुर्खी चौफुलीवर अनेक अपघात होतात. त्यातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा दौरा झाल्याने या मार्गावरील गतिरोधक काढून टाकण्यात आले. त्यामुळे या चौफुलीवर पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

- Advertisement -

नांदुर्खी बुद्रुक येथून शिर्डी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी दुपारी पोलिस वाहन काकडीकडून शिर्डीकडे येत असताना कर्नाटक येथील गाडी नंबर के अ 03 एम आर 9553 या चार चाकी वाहनाने सिन्नरकडे जाणार्‍या दुचाकी (क्रमांक एम एच 15 जे ई 576) या गाडीला जोराची धडक दिली.

दुचाकीस्वार सुनील दमाजी गोरे, अनिल दमाजी गोरे व वैशाली सुनील गोरे हे दुचाकीवरून रस्त्यावरच उडून पडले. पोलिस वाहनांच्या समोरच हा अपघात झाल्याने पोलिस गाडी थांबली. पोलिस कॉन्स्टेबल आव्हाड व स्थानिक नागरिक रोहन चौधरी, सागर वाणी, संतोष चौधरी या तरुणांनी या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

राष्ट्रपती दौर्‍याच्या निमित्ताने गतिरोधक काढून टाकण्यात आलेले आहेत. गतिरोधक नसल्याने अनेक लहान मोठ्या अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. हे थांबविण्यासाठी नांदुर्खी गावच्या वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या चौफुलीवर पुन्हा गतिरोधक बसविण्यासाठी विनंती करणार असल्याचे बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी, सरपंच माधवराव चौधरी, उपसरपंच विरेश चौधरी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या