Friday, October 11, 2024
Homeनगरनांदुर्खीमध्ये डेंग्यूचे पंधरा रुग्ण

नांदुर्खीमध्ये डेंग्यूचे पंधरा रुग्ण

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक या गावातील वाड्या वस्त्यांवर काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले असून गोरगरीब व गावातील अनेक गाव पुढारी या साथीच्या तडाख्यात सापडले आहेत. नांदुर्खीमध्ये सध्या 15 रुग्ण डेंग्यूने ग्रस्त आहेत.

- Advertisement -

काही जण शिर्डीच्या साईनाथ व साईबाबा हॉस्पिटलमध्ये तर काही जण खासगी हॉस्पिटलमध्ये या साथीच्या आजारावर उपचार घेत आहेत. मात्र या आजाराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने रोग प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे. तरच हे थैमान थांबू शकेल, असे नागरिक म्हणतात. गावातील बर्‍याच रुग्णाच्या रक्तातील पेशी डेंग्यू आजारामुळे दहा हजारांपर्यंत जाऊन रुग्णांची परिस्थिती चिंताजनक होत आहे.

तरी त्वरित राहाता तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा रोग नियंत्रक प्रतिबंधक समिती यांनी गावात येऊन सदर साथीच्या आजाराचा नायनाट होण्यासाठी उपाययोजना करून गोरगरीब जनतेला या साथीच्या आजारापासून मुक्त करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे व लहुजी सेनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.

गावात साथीच्या आजाराने थैमान घातले असल्याची माहिती उपसरपंच विरेश चौधरी यांना दिली असता त्वरित गावात रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. याबाबत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच प्रयत्नशील असल्याचे विरेश चौधरी यांनी सांगितले.

गेली 20 ते 25 दिवसांपासून साथीच्या आजाराचे गावात प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःच्या घराजवळील गटारी स्वच्छ करून आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन या आजाराचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत आपण ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माहिती देणार असल्याचे राहाता बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या