राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नांदूरमधमेश्वर बंधार्यात मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी काल शनिवारी सायंकाळी 7 वाजता जलद कालव्याला 400 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी दारणा समुहातुन जलद कालव्याला पाणी द्यावे, अशी मागणी आंदोलनाने लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु असताना त्या भागातील शेतकर्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकीनंतर पाणी सोडण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडाळाचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक यांनी एका खास आदेशाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी 800 दलघफू म्हणजेच पाऊण टीएमसी हुन अधिक पाणी देण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या जलसंपदा विभागाला दिले होते.
त्यात दारणा समुहातील धरणांच्या मृतसाठ्यातून 400 दलघफू व गोदावरी कालव्यासाठीच्या पाण्यातील 400 दलघफू पाणी असे 800 दलघफू पाणी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल शनिवारी सायंकाळी 7 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्यातून 400 क्युसेकने पाणी जलद कालव्यात झेपावले आहे. आज रविवारी या विसर्गात वाढ करुन सुरुवातीला 700 क्युसेक व नंतर 800 क्युसेकने विसर्ग वाढविला जाणार आहे. गोदावरी कालव्यांचे पाणी कमी करुन मराठवाड्याला देण्यात आल्याने राहाता, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याने पाणी मराठवाड्याला देण्यात आले. जलद कालव्याचा कोठा त्यांच्या यापूर्वीच्या आवर्तनातून संपला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा त्यांनी पाणी घेतले. पिण्याचे पाणी महत्वाचे असले तरी वर्षभराचे नियोजन जलदकालव्याचे व्हायला हवे! कालव्यांच्या मुखाशी की धरणांच्या मुखाशी पाण्याचे मोजमाप हा मुद्दा स्पष्ट नसल्याने वादातीत आहे. त्याचा फटका मात्र गोदावरीच्या लाभधारकांना बसत आहे. समन्यायी कायद्या अंतर्गत जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. आता ही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी नेले जात आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभधारकांना हक्काचे पाणी कधी मिळेल हा प्रश्न खर्या अर्थाने ऐरणीवर आला आहे.
डाव्या, उजव्या कालव्यांचे सिंचन आवर्तनाची आशा मावळली
काल दिनांक 25 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता जलद कालवा 400 क्युसेक्सने सुरु केला असून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. जलद कालवा मुखाशी 800 दलघफू म्हणजे एकुण 9000 क्युसेक्स पाणी देण्यात यावे असे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश आहेत. त्यामुळे गोदावरी डाव्या, उजव्या कालव्यांचे सिंचन आवर्तनाची आशा मावळली आहे.
दारणा समुहाचे साठे !
दारणा 22.02 टक्के
मुकणे 13.15 टक्के
वाकी 11.92 टक्के
भाम 00.00 टक्के
भावली 0.49 टक्के
वालदेवी 5.38 टक्के