नांदूरशिंगोटे । वार्ताहर Nandurshingote
नांदूरशिंगोटे व परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दोन ते तीन दिवसाच्या अंतराने शेतकर्यांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बोडके वस्तीजवळ दोन बिबट्यांचे दर्शन घडल्याने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे.
बोडके वस्ती येथे रुपेश शिवाजी शेळके हे रात्री ट्रॅॅक्टर घेऊन जात असताना त्यांना दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यांनी ट्रॅक्टर जागेवर थांबवताच ट्रॅॅक्टरच्या मागे एक व पुढे एक असे दोन बिबटे येऊन बसले होते. इतक्या जवळून दोन बिबटे दिसताच शेळके यांची भंबेरी उडाली. थोडा वेळ थांबून त्यांनी ट्रॅॅक्टर पुन्हा सुरू केला. त्यानंतर हे बिबटे शेळके वस्तीकडे गेल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरदर्यांमध्ये बिबट्यांना भक्ष्य नसल्यामुळे ते बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत. वन विभागाने डोंगराच्या पायथ्याशी बिबट्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास ते वस्तीकडे येणार नाहीत, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
याच भागातून वनविभागाने काही दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद केले आहे.दरम्यान, रात्री 11 वाजता बिबट्यांच्या या जोडीला शिवाजी नागरे यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारताना रुपेश शेळके यांनी पाहिले. रुपेश शेळके यांना एका रात्रीत तीनदा बिबट्यांनी दर्शन दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपली दुभती जनावरे बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी रात्रीचा पहारा करण्याची वेळ शेतकर्यांवर आली असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.