मुंबई | Mumbai
देशात गेल्या काही वर्षांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोफत योजनांची घोषणा करण्यात येत असते. तसेच सध्या देशात केंद्र सरकारसह राज्य सरकार देखील लोकांना फ्री योजना देत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देखील या मोफत योजनांवर ‘फ्रीबीज कल्चर’ म्हणून टीका केली होती. त्यानंतर आता देशातील दिग्गज आयटी कंपनी, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी टायइकॉन मुंबई-2025 (Tycon Mumbai-2025) कार्यक्रमात बोलताना मोफत गोष्टी देण्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना नारायण मूर्ती म्हणाले की, “देशातील गरिबी मोफत वस्तूंनी नाही तर नाविन्यपूर्ण उद्योजकांनी रोजगार निर्मिती करून दूर केली जाईल. या कार्यक्रमात, नारायण मूर्ती यांनी उद्योजकांना (Entrepreneurs) अधिक कंपन्या आणि व्यवसाय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आपण नाविन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो तर सूर्यप्रकाशातील सकाळच्या दवाप्रमाणे गरिबी नाहीशी होईल”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “तुमच्यापैकी प्रत्येकजण लाखो नोकऱ्या (Job) निर्माण करेल आणि आपल्या देशातील गरिबी दूर होईल यात मला काहीच शंका नाही. मोफत वस्तू देऊन तुम्ही गरिबीची समस्या सोडवू शकत नाही, कोणताही देश यात यशस्वी झालेला नाही. तसेच ज्यांना राजकारण किंवा प्रशासनाबद्दल जास्त माहिती नाही. त्यांना यावेळी दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येत आहे. मात्र, यात फायदा किती होत आहे. याचा देखील अभ्यास झाला पाहिजे. ज्या घरांमध्ये २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येत आहे आपण त्या घरांमध्ये सर्वेक्षण करू शकते जेणेकरून मुले जास्त अभ्यास करत आहेत की नाही याची आपल्याला माहिती मिळेल”, असेही नारायण मुर्ती यांनी बोलताना म्हटले.
तसेच मूर्ती यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या अतिवापराचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, “अनेक तथाकथित एआय सोल्यूशन्स हे केवळ ‘मूक, जुने कार्यक्रम’ प्रगत तंत्रज्ञान म्हणून पुनर्ब्रँड केलेले आहेत. एआयचा खरा उपयोग केवळ दिखाव्यासाठी नसून समस्या सोडवण्यासाठी व्हायला हवा. तरुण उद्योजकांनी खऱ्या समस्यांवर उपाय शोधून देशाच्या विकासात योगदान द्यावे, देशाचा फायदा मोफत वाटून होणार नाही तर रोजगार निर्माण करून होणार आहे. त्यांच्या सूचना केवळ धोरणात्मक शिफारशी आहेत. योग्य धोरणे आखली तर गरिबीसारख्या समस्या सुटू शकतात”, असेही नारायण मूर्ती यांनी सांगितले.