शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरात दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) पर्दाफाश केला असून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून धारदार चाकू, नशेचे इंजेक्शन, सहा रिकाम्या सिरिंज आणि मोटारसायकल असा सुमारे 50 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिर्डीतील कालिकानगर ते बन रोड, राजगुरुनगर परिसरात काही सराईत गुन्हेगार मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गालांडे यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईत सावड्या ऊर्फ साईनाथ गोरक्षनाथ पाचारणे (रा. राजगुरुनगर, शिर्डी), कुणाल प्रकाश मुदलीयार (रा. पानमळा, शिर्डी) आणि प्रथमेश बबन घोरपडे (रा. पानमळा, शिर्डी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत असलेले सौरव किरण गायकवाड व मुसा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता 21 सेंटीमीटर लांबीचा धारदार चाकू, 30 मिली क्षमतेची नशेच्या इंजेक्शनची बाटली (Narcotic Injections), सहा रिकाम्या सिरिंज आणि काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याची पूर्वतयारी केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 826/2026 भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(4), 310(5) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गालांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोर्हाडे करीत आहेत.




