नाशिक | भारत पगारे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (Anti Corruption Beuro) लाचखोर अधिकारी (Corrupt Officer) आणि कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली असली, तरी पुढे न्यायालयात खटला भरण्यासाठी लागणाऱ्या अभियोगपूर्व मंजुरी अभावी शेकडो संशयित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे फाईल-संरक्षण सुरु असल्याचे समोर आले आहे. विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यभरात तब्बल ४३५ प्रकरणांमधील अभियोगपूर्व मंजुरी विविध शासकीय विभाग व सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे, ३०५ प्रकरणे ही ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून लटकलेली आहेत. नियमानुसार दिवसांच्या आत मंजुरी देणे बंधनकारक असताना, प्रशासकीय अनास्थेमुळे संशयितांवरील कायदेशीर कारवाईला ब्रेक लागला आहे. लाचखोरी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी गृह विभागावर आहे, तोच गृह विभाग लाचखोरांवर खटला भरण्याची परवानगी देण्यात पुढे (प्रलंबित प्रकरणात) असल्याचे आकडेवारीवरून निष्पन्न झाले आहे.
मजूरांसाठी काळरात्र ठरली! भरधाव ट्रकची पिकअपला जोरदार धडक; ८ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
पोलीस/कारागृह/उत्पादन शुल्क विभागात सर्वाधिक ८५ प्रकरणे प्रलंबित असून, त्यातील ५४ प्रकरणे ९० दिवसांहून अधिक काळापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय महसूल/भूमी अभिलेख व नोंदणी विभागात ६२ प्रकरणे प्रलंबित असून, त्यातील ३३ प्रकरणे ९० दिवसांहून रेंगाळली आहेत. ग्रामविकास व पंचायत राज विभागातील ६३ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे ९० दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत. तसेच, नगर विकास विभागः ५१ प्रकरणांपैकी ४० प्रकरणे मुदतीनंतरही धूळ खात पडून आहेत. तर, शासकीय पातळीवर १०१ प्रकरणे प्रलंबित असताना, थेट विभागातील सक्षम अधिकाऱ्यांकडे तब्बल ३३४ प्रकरणे प्रलंबित आहेत. यावरून वरिष्ठ अधिकारी लाचखोर सहकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक परिक्षेत्राचा वरचष्मा
०१ जानेवारी २०२६ ते ०७ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील कारवाईच्या आकडेवारीनुसार, लाचखोरीच्या कारवायांमध्ये नाशिक परिक्षेत्राने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. नाशिक परिक्षेत्रात एकूण सर्वाधिक १०८ गुन्हे दाखल झाले असून १७३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात १०७ सापळा कारवाया आणि १ अन्य भ्रष्टाचार प्रकरणाचा समावेश आहे. शिवाय, पुणे परिक्षेत्र ९३ गुन्ह्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
परिक्षेत्रनिहाय कारवाईची स्थिती (०१ जानेवारी ते ०७ सप्टेंबर-२०२६)
परिक्षेत्र एकूण गुन्हे एकूण संशयित
नाशिक १०८ १७३
पुणे ९३ १३४
ठाणे ७२ ९९
छत्रपती संभाजीनगर ७९ १०३
अमरावती ५७ ९०
नागपूर ५६ ११४
नांदेड ४२ ५५
मुंबई २७ ४९
एकूण ५३४ ८९७




