उमराणे | वार्ताहर | Umarane
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Aagra Highway) शहादा आगाराच्या पुणे (Pune) हून शहादा जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास उमराणे रामदेव बाबा मंदिर जवळ घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात चालक राकेश दिलीप बुवा यांच्यासह १० ते ११ प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाले असून, वाहक गोविंद वसंत निकमसह इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत. शहादा डेपोची बस (क्र. एमएच १४ एमएच २३१०) रात्री १० वाजता पुण्याहून निघाली होती. मनमाड ते मालेगाव (Manmad to Malegaon) दरम्यान चोंढी रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे बस गिरणारे उमराणे मार्गे घेण्यात आली होती.
यावेळी मुबंई-आग्रा महामार्गवरील रामदेवजी बाबा मंदिराच्या अगोदर भरधाव बसवरील चालकाचे (Bus Driver) नियंत्रण सुटल्याने उमराणे शिवारात हा अपघात झाला. यावेळी बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन झाडांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर अचानक बस झाडावर आदळल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी भटू देवरे, गोटू देवरे, सोनू देवरे, भूषण देवरे, सतीश देवरे, जीवन देवरे यांच्यासह आदींनी तात्काळ धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमी प्रवाशांना उमराणे सौंदाणे-चिंचवे येथील रुग्णवाहिका बोलवून तातडीने उपचारासाठी मालेगाव जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





