नाशिक | Nashik
मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी घसरल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशिप) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. ठाकूर हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कामावर जात असताना हा अपघात घडला. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि त्यामुळे झालेली वाहतुकीची प्रचंड गुंतागुंत यामुळे एका कामगाराच्या (Worker) जीवावर बेतली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील अर्धवट आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




