नांदुरी | वार्ताहर | Nanduri
सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे वाहतूक नियोजन करत असताना भरधाव सियाज कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दिनकर मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.१८ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास नांदुरी येथे हा भीषण अपघात (Accident) घडला. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने गडाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. अभोणा चौफुलीवरून चिखली मार्गे नांदुरी प्रवेशद्वारा जवळील पार्किंग परिसराकडे वाहनांना वळविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
याच वाहतूक (Trafic) व्यवस्थेदरम्यान नांदुरी टी-पॉइंट येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसह काही भाविकांना भरधाव सियाज कारने जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस अधिकारी विजय गायकवाड यांच्यासह अनेक जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र विजय गायकवाड यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना पोलीस अधिकारी विजय गायकवाड यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलीसांनाच अशा प्रकारच्या अपघाताला सामोरे जावे लागल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या घटनेने पोलीस दलासह नांदुरी व परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाबाबत तसेच घटनेच्या पुढील तपासाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
अपघातातील जखमी
या अपघातात एपीआय दिनकर मुंडे यांच्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे. तर हवालदार सचिन राऊत यांच्या डाव्या पायाचा पंजा फ्रॅक्चर झाला आहे. याशिवाय भाविक मोरेश्वर बाळू पाटील (वय ५२, रा. महापे, मुंबई) यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर त्यांची पत्नी तेजस्वी पाटील आणि सोबत असलेले गोपाळ एकनाथ सोनवणे यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे.
पोलीस प्रशासनाकडून तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच जवळच तैनात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला असून, आरोपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात तसेच भाविकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




