चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
तालुक्यातील कुंदलगाव शिवारातून जाणाऱ्या मालेगाव-मनमाड मार्गावर (Malegaon-Manmad Highway) शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोन्ही ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, “भरधाव मालट्रक (आरजे ०९-जीसी-४४९९) आणि ट्रक (केए-५६-७९९३) यांच्यात कुंदलगाव शिवारात समोरासमोर धडक झाली. या अपघातात अब्दुल रहमान बुखारी (कर्नाटक), समी खान (कर्नाटक), वसीम अक्रम खान (रतलाम, मध्यप्रदेश) या तिघांचा मृत्यू (Death) झाला.
तर आयान शेख व शोएब खान हे दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे (Police) पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार स्वप्निल रंधे, राजू गायकवाड, शिवनाथ शेळके व योगेश हटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने मालेगाव-मनमाड मार्गावरील वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांचे सांगाडे रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचे चांदवड पोलीस ठाण्यात (Chandwad Police Station) नोंद घेण्यात आली.




