नांदुरी | प्रतिनिधी | Nanduri
येथील दोन युवक (Youth) कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा (Abhona) गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) घडला होता. यात दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्य झाला. तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नांदुरी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे दोघेही युवक सप्तश्रृंगी गडावर (Saptashrungi Gadh) मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. मात्र, अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता त्यात हे युवक पडलेले होते.चिखलाने दोघेही पूर्णपणे माखलेले होते.पुणे येथील काही युवक (Youth) सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असतांना त्यांना अपघातस्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसले. यानंतर त्यांनी या दोघांनाही चिखलातुन बाहेर काढत स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविले.
दरम्यान, योगेश वाघ यांच्यावर शुक्रवारी रात्री दहा वाजता आणि महेश गायकवाडवर आज (शनिवारी) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदुरी गावासह (Nanduri Village) पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, अपघाताचा (Accident) पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करीत आहेत.





