सिन्नर | Sinnar
समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) मऱ्हळ शिवारात कंटेनरवर पाठीमागून आयशर टेम्पो आदळल्याने झालेल्या अपघातात (Accident) टेम्पोतील दोघे ठार झाल्याची घटना आज (दि.२९) पहाटे साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रयागराज (Prayagraj) येथून कुंभमेळ्याचे साहित्य घेऊन मुंबईकडे (Mumbai) येणारा आयशर टेम्पो क्र. एमएच.०४ ए.एफ.५५३४ हा मऱ्हळ शिवारातील चॅनल क्र.५५१ समोरुन जात असतांना कंटेनर क्र.एमएच ४६ के.यु. २५४७ वर जाऊन धडकला. त्यात आयशर टेम्पोतील विजय यादव (२४) रा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश व सनाऊल्ल उमर चौधरी (४७) रा. मुंबई हे जागीच ठार झाले.
या अपघाताची खबर मिळताच नांदूर शिंगोटे पोलीस दूर क्षेत्राने तातडीने समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष व संबंधित सर्व बचाव पथकाला याबाबत माहिती दिली. या पथकाचे मिलिंद सरवदे यांच्यासह त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अपघातात आयशर टेम्पोच्या केबीनचा चक्काचूर झाला होता, तर चालकासह दोघेही केबिनमध्ये अडकले होते. बचाव पथकाने त्यांना बाहेर काढून सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत (Death) घोषित केले.
दरम्यान, बचाव व सुरक्षा पथकाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या (Road) कडेला लावल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, हवालदार सतीश बैरागी पुढील तपास करीत आहेत.