Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Assembly Election 2024: प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण; नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक तर,...

Nashik Assembly Election 2024: प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण; नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक तर, पूर्व, मध्यच्या ‘इतक्या’ फेऱ्या

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंधिस्त झालेले आहेत. या मतदान यंत्रातील मतांची मोजणी शनिवार (दि. २३) सकाळपासून केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी पंधरा विधानसभा मतमोजणी केंद्रावर 14 टेबलच्या माध्यमातून मोजणी केली जाणार आहे. दिंडोरी येथे जागा कमी असल्यामुळे 12 टेबलच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले

विधानसभा निवडणुकीत मागील मतदानाच्या तुलनेत जास्त ६९.२ टक्के मतदान झाल्यानंतर आता शनिवारच्या मतमोजणी व निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात सर्वात वेगाने देवळालीचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. तर सर्वात उशिरा नाशिक पश्चिमचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये बुधवारी (दि.२०) मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. संबंधित विधानसभा मतदारसंघांतच मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची बहुतांश तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात मतमोजणीच्या सर्वात कमी फेऱ्या देवळाली आणि निफाड मतदार संघाच्या होणार आहेत. त्यामुळे येथील निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० फेऱ्या होतील. त्यामुळे तेथील निकाल उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सद्य स्थितीत स्ट्राँग रुम परिसर सील करण्यात आला असून, याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: नांदगावची मतमोजणीची तयारी पूर्ण; विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार

मतदारसंघात १०० ते १२० कर्मचारी
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाचवेळी मतमोजणी होईल. टपाली मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ईव्हीएममधील मते मोजण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. याशिवाय प्रत्येक सात टेबलसाठी एक अधिकारी, टॅब्युलायजेशन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी वर्ग कर्तव्यावर असणार आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व मतदारसंघांचे कल समजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

असे असणार मतदारसंघ, फेऱ्या, ठिकाण
नांदगाव – २५ – नवीन तहसील कार्यालय, मालेगाव मध्य – २५ – छत्रपती शिवाजी जिमखाना, संगमेश्वर, मालेगाव बाह्य – २६ – शासकिय वखार महामंडळ गोडावून, बागलाण – २१ – पंडित धर्मा पाटील मराठा हायस्कूल हॉल, कळवण -२५ – नवीन प्रशासकीय इमारत, चांदवड – २२ – नवीन प्रशासकीय इमारत, आयटीआय रोड, येवला- २४ – पैठणी क्लस्टर गोडावून, अंगणगाव , सिन्नर – २५ – तहसील कार्यालय, निफाड – २० – नवीन प्रशासकीय इमारत, दिंडोरी – २७ – मविप्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिक पूर्व – २४ – विभागीय क्रिडा संकूल, आडगाव नाका, नाशिक मध्य – २२ – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक पश्चिम – ३० – राजे संभाजी स्टेडीयम, अश्विन नगर, देवळाली – २० – जिल्हा इव्हीएम केंद्र, पिंप्री सय्यद, इगतपूरी – २२ – शासकीय कन्या विद्यालय, नाशिक.

15 विधानसभा निहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या निगराणी मध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांची सरमिसळ करून त्यांची टेबल निश्चित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये टपाली मतांची मोजणी केली जाईल, त्यामध्ये प्रत्येक टेबलवर प्रामुख्याने 500 मतांची मोजणी केली जाईल, यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन नंबरचा मोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक यांची विशेष नियुक्ती केली आहे.

मतमोजणी प्रक्रिया ही 14 टेबल वरील मतांच्या मोजणीला एक फेरी गणली जाईल. मतांच्या आकड्यांची पडताळणी केल्यानंतर फेरीचे आकडे घोषित केले जातील. एवी व ईव्हीएम व टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल घोषित केला जाईल. संपूर्ण निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एनकोर प्रणाली द्वारे उपलब्ध केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वच ठिकाणी बिघडलेले यंत्र केले बदली
नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्रात विवध प्रकारच्या समस्या आढळल्यामुळे यंत्र बदलण्यात आले होते. सदर यंत्र हे सेक्टर ऑफिसरकडेच उपलब्ध असतात बाहेरून आणण्याची गरज नसते.

प्रत्यक्षात १५ विधानसभा मतदार संघातील विविध केंद्रामध्ये मतदान यंत्र लावताना त्यात बिघाड आढळल्यामुळे ४८ बी यू, ५२ सी यू तर ९५ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले होते. मॉक पोलच्यावेळी २८ बी यु, १९ सीयू व ३८ व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड अढळल्याने ते बदलण्यात आले तर मतदान प्रक्रिया सुरू असताना काही यंत्रात बिघाड झाल्यामुळे २१ बी यु, १९ सी यु व ६६ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली. हे यंत्र बदलताना तेथील विविध पक्षांच्या पोलिंग एजंटच्या सहमतीने प्रक्रिया पूर्ण केली जाते.

विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का वाढला आहे वाढलेली आकडेवारी निश्चितच चांगली आहे. मात्र ती अजून वाढण्याची संधी असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सुरुवातीला निश्चित केल्याप्रमाणे राज्याच्या टक्केवारी पेक्षा आपला टक्का वाढण्याचा प्रयत्न होता त्यात यश मिळालं आहे.

-जलज शर्मा – जिल्हा निवडणूक अधिकारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या