नाशिक | Nashik
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही वेळापूर्वी नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला होता. त्यात अजित पवार गटाचे निफाडचे उमेदवार दिलीप बनकर विजयी झाले होते. त्यानंतर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे. अशातच आता अजित पवार गटाच्या देवळाली मतदारसंघाच्या उमेदवार सरोज आहिरे यांची विजयाकडे आगेकूच झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा बोलबाला दिसून येत आहे.
सरोज अहिरे यांनी अठराव्या फेरी अखेर ३९ हजार ८५९ मतांची आघाडी मिळाली आहे. आतापर्यंत १ लाख ६४ हजार ३० मतांची मोजणी पूर्ण झाली असून यात शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांना ३७ हजार ४०४ अजित पवार गटाच्या
सरोज अहिरे यांना ७७ हजार २६५ आणि ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना ३७ हजार २१९ मते मिळाली आहेत. त्यामुळे आहिरे यांनी ३९ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
तसेच तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी १७ व्या फेरीअखेर २१ हजर ७२२ मतांची आघाडी घेतली आहे. तर दिंडोरी मतदार संघातून नरहरी झिरवाळ यांना ३९ हजार १९६ मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच इगतपुरीतून हिरामण खोसकर यांची विजयाकडे वाटचाल असून त्यांनी ५० हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून २१ व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार आसिफ शेख रशीद यांनी पुन्हा ७१० मतांची आघाडी घेतली आहे. शेख हे अपक्ष उमेदवार जरी असले तरी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत.